आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Mumbai Builder Refuses To Sell Flat To A Marathi

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मुंबई: मांसाहारी मराठी कुटुंबाला फ्लॅट देण्यास बिल्डरचा नकार, काँग्रेसचे आंदोलन!

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- मुंबईतील उपनगर गोरेगाव परिसरात सुरू असलेल्या सोसायटीत फ्लॅट बुक करण्यासाठी गेलेल्या एका मराठी परिवाराला बिल्डरने फ्लॅट विकण्यास नकार दिला आहे. फक्त शाकाहारी कुटुंबियांनाच या सोसायटीत फ्लॅट विकले जात असल्याचे बिल्डरकडून सांगण्यात आल्याचा दावा एका मराठी दांपत्याने केला. दरम्यान या घटनेनंतर शुक्रवारी बिल्डरच्या ऑफिसवर संतप्त लोकांनी जोरदार राडा घातला. मुंबईतील गोरेगाव भागात राहणारे वैभव रहाटे हे आपल्या पत्नीसह श्रीनाथजी बिल्डरच्या साईटवर फ्लॅट बुक करण्यासाठी गेले होते. त्यावेळी मराठी असल्याचा हवाला देत व मराठी लोक मांसाहार करीत असल्याचा हवाला देत फ्लॅट फक्त शाकाहारी लोकांनाच विकत असल्याचे सांगितले.
या घटनेनंतर संतप्त झालेल्या रहाटे यांनी मालाड पोलिस ठाणे गाठले व संबंधित बिल्डराविरोधात तक्रार केली. मात्र, पोलिसांनी तक्रार करून घेण्यास नकार दिला. त्यानंतर या घटनेची माहिती मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरूपम यांना मिळाली असता ते व त्यांचे कार्यकर्ते पोलिस ठाण्यात गेले व आंदोलन करीत बिल्डरांविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. निरुपम यांनी माध्यमांना सांगितले की, बिल्डर केवळ जैन, मारवाडी आणि गुजराती परिवारांनाच फ्लॅट विकतात. जर अशा प्रकारे धार्मिक व जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला तर ते आम्ही सहन करणार नाही.
याआधी, मुंबईतील झिशान अली खान या एमबीए पदवीधर मुस्लिम तरूणाला एका गुजराती कंपनीने मुस्लिम असल्याचे सांगत नोकरी नाकारली होती. तर गुजराती मॉडेल मिसबाह कादरी या तरूणीने आपण मुस्लिम असल्याने एका सोसायटीतून आपल्याला हाकलून दिल्याचा आरोप केला होता. या दोन्हीही प्रकरणी राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोगाकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे. या दोन्ही प्रकरणाची चौकशी अल्पसंख्याक आयोग करीत आहे.