आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंबईकरांची दाणादाण; सिग्नल बिघाडल्याने तिन्ही मार्गावर रेल्वेसेवा विस्कळीत

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - पहाटेपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने सोमवारी मुंबईची दाणादाण उडविली. वादळी वारे व पावसामुळे शहर परिसरात 78 झाडे कोसळली असून तर 84 ठिकाणी पाणी तुंबल्याने रस्त्यांना तळ्याचे स्वरूप आले होते. पावसाने सिग्नलमध्ये बिघाड झाल्याने तिन्ही मार्गावरील रेल्वे वाहतूकही दिवसभर विस्कळीत झाली होती.


मुंबईत शुक्रवारी मान्सूनचे आगमन झाले. सोमवारी पहाटेपासून पावसाचा जोर वाढला असून गेल्या 24 तासात पश्चिम उपनगरात 156 मिमी तर पूर्व उपनगरात 109 मिमी पावसाची नोंद झाली. पश्चिम, मध्य आणि हार्बर या तिन्ही मार्गावरील रेल्वे वाहतूक सकाळपासून विस्कळीत होती. त्यामुळे कार्यालय अनेकांचा ‘लेटमार्क’ पडला. पूर्व आणि पश्चिम द्रुतगती मार्गावरील वाहतूक दुपारपर्यंत मंद होती. परळ, दादर या भागात रस्त्यावर दुपारपर्यंत गुडघाभर पाणी साचले होते. त्यामुळे चाकरमान्यांना गाड्या रस्त्यात पार्क करत पाण्यातून वाट काढत कार्यालय गाठावे लागले.


इमारत कोसळून दोन ठार
शहरात 84 ठिकाणी पाणी तुंबल्याच्या तक्रारी पालिकेकडे आल्या होत्या. आठ घरे पडली. माहिममध्ये इमारत कोसळून वृद्ध महिलेसह दोघे ठार तर 20 जण ढिगा-याखाली दबल्याची भीती. आठठिकाणी शॉर्टसर्किट. शहर, पूर्व, पश्चिम उपनगरांमध्ये 78 झाडे कोसळली.


आणखी बरसणार
कुलाबा वेधशाळेने दिलेल्या माहितीनुसार येत्या 24 तासांमध्ये मुंबई शहरात पावसाच्या
जोरदार सरी कोसळण्याची शक्यता आहे. त्यामुळे पालिका प्रशासनाला सतर्कतेचे आदेश देण्यात आल्याची माहिती पालिका आयुक्त सीताराम कुंटे यांनी पत्रकारांना दिली.


ठाण्यात दोन मुले वाहून गेली
ठाण्यात तुडुंब भरून वाहणा-या नाल्यात मुंब्रा येथील दोन अल्पवयीन मुले वाहून गेली. कालू राठोड आणि गीता ठाकूर अशी त्यांची नावे असून ते मुंब्रा येथील रहिवासी आहेत. उशिरापर्यंत त्यांचा शोध सुरू होता.