आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गाळ न काढल्याने मुंबई ‘गाळा’त, सत्ताधारी, विराेधकांनाही मिळताे वाटा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- मुंबई महापालिकेत २५ वर्षांपासून सत्तेवर असलेल्या शिवसेनेच्या सुवर्णमहोत्सवी वर्षाच्या पहिल्याच दिवशी मुसळधार पावसाने महापालिकेच्या कारभाराचे पितळ उघडे पाडले. याला फक्त गाळ न काढणारे कंत्राटदारच जबाबदार नसून या कंत्राटदारांची सत्ताधारी, विरोधक तसेच प्रशासनाबरोबरची ‘युती’ कारणीभूत असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले.

यंदा नालेसफाईवर १५० काेटी रुपये खर्च केल्याचा दावा केला जात असला तरी प्रत्यक्षात इतक्या मोठ्या निधीचे काम झालेले नाही. कंत्राटदारांनी गाळ काढलेलाच नसून तो फक्त कागदोपत्री दाखवल्याचे यातून उघड हाेते.

मुंबईच्या नालेसफाईचे काम तीन टप्प्यांत केले जाते. निविदा मंजूर झाल्यानंतर १ एप्रिलपासून कामाला सुरुवात होते. जूनपर्यंत ७० टक्के काम करण्याचा नियम आहे. पहिल्या टप्प्याचे काम हे १३ जूनपर्यंत चालते. नंतर पावसाळ्यात २० टक्के, तर पावसाळ्यानंतर १० टक्के काम केले जाते. मात्र, कंत्राटदार बरीचशी कामे ही नुसती देखावे म्हणून करतात. वांद्रे, सांताक्रूझ अशा महत्त्वाच्या मोठ्या नाल्यांवर तसेच मिठी नदीतील गाळ काढला असल्याचा देखावा केला जातो. सत्ताधारी कामाची पाहणी करतात अाणि त्याची पाठ वळताच काम पुन्हा रेंगाळते.

बाेगस पत्रे अाणली
बराचसा गाळ हा नाले तसेच नदीच्या काठावर टाकला जात असल्याने पुन्हा तो तेथेच वाहून जातो. या सर्व बाबींचा विचार करून कंत्राटदारांनी काढलेला गाळ कुठे टाकला हे दाखवावे, असे या वेळी सक्तीचे करण्यात आले. मात्र, कंत्राटदारांनी यावरही शक्कल लढवली. भिवंडीजवळील मानकुली तसेच अन्य ग्रामपंचायतींच्या क्षेत्रात गाळ टाकल्याचे पत्रे आणली. पण ही पत्रे बोगस असल्याचे काँग्रेसचे नगरसेवक मोहसीन हैदर यांचे म्हणणे अाहे.
पैशांची खिरापत
निविदा मंजूर झाल्यानंतर कंत्राटारांकडून पैशाचे वाटप केले जाते. यात जसा सर्वाधिक वाटा सत्ताधाऱ्यांचा असताे तसाच गटनेते, विरोधी पक्षनेते, अधिकारी, वाॅर्ड ऑफिसर,नगरसेवकांचाही असताे. एखादे काम १०० रुपयांचे असल्यास कंत्राटदाराच्या हाती फक्त ७० ते ७५ रुपये उरतात आणि यात त्याला काम करावे लागते. यामुळे दर्जा खालावताे.

रेल्वेवर खापर फाेडले
रुळावर पाणी साचण्यासी रेल्वे प्रशासन जबाबदार आहे, असे महापालिका सांगत असली तरी प्रत्यक्षात तसे नाही. झोपड्या, चाळींमधील गटारे, नालेसफाईचे काम न झाल्याने तुंबलेले पाणी रेल्वे रुळावर जाते. पालिकेप्रमाणे रेल्वेकडून दरवर्षी रुळालगतची सफाई केली जाते. मात्र, ती नाममात्र असते.
चार हजार कोटींचा घोटाळा : धनंजय मुंडे
नालेसफाईच्या कामात सत्ताधारी, अधिकाऱ्यांच्या संगनमताने घोटाळा हाेताे. मागील दहा वर्षांत चार हजार कोटींचा घोटाळा झाला आहे. नाल्यामधून गळ काढल्याचे दाखवून िबले काढली जातात. प्रत्यक्षात बिलाच्या तुलनेत दहा टक्केही गाळ काढला जात नाही. या घाेटाळ्याची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी विधान परिषद विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केली.