आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मायानगरी ‘बुडाली’; 500 कोटी पाण्यात, कोट्यवधी नागरिकांचे हाल

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- पंधरा दिवसांचा सरासरी पाऊस एकाच दिवसात पडल्याने शुक्रवारी मुंबई अक्षरश: पाण्यात बुडाली. मुसळधार पावसामुळे रस्ते जलमय झाले, त्यामुळे शहरातील तिन्ही लोकल मार्गांसह लांब पल्ल्यांच्या गाड्यांना ‘ब्रेक’ लागला. परिणामी देशाच्या आर्थिक राजधानीची दिवसभर चाके बंद राहिली. त्यामुळे तब्बल 500 कोटींचे नुकसान झाल्याचा दावा केला जात अाहे. येत्या 24 तासात मुंबई परिसरात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
गुरूवारी रात्रीपासून सुरू असलेला पाऊस शुक्रवारी दिवसभर कमी अधिक प्रमाणात कोसळत होता. त्यामुळे शुक्रवारी सकाळपासूनच घडल्याने चाकरमानी मुंबईकरांनी घराबाहेर पडणे टाळले असले तरी तळहातावर पोट घेऊन जगणाऱ्या व रोजगार-व्यवसायासाठी घराबाहेर पडलेल्या कोट्यवधी मुंबईकरांचे हाल झालेच. मात्र गेली दोन दशके मुंबई महानगरपालिकेत सत्ता असलेल्या शिवसेनेच्या वाईट कारभाराचे पितळ आजच्या पावसाने पुन्हा उघड पडले. यंदाच्या हंगामातील मृग नक्षत्राने देशाच्या आर्थिक राजधानीला जोराचा झटका दिला. मुंबई, ठाणे, नवी मुंबई ही शहरे अक्षरश: जलमय होऊन त्यांना तळ्याचे स्वरूप आल्याचे पाहायला मिळाले.
गुरुवारी रात्री ८ ते शुक्रवारी सकाळी ८ या काळात शहरात १८८ मिमि पावसाची नोंद झाली असून पूर्व उपनगरात १५५ तर पश्चिम उपनगरात १७२ मिमि पाऊस नोंदला गेला आहे. सलग १२ तास पाऊस आणि त्यातच समुद्रात ४.४७ मी. उंचीची मोठी भरती आल्याने शहरातील पाण्याचा निचरा बंद झाल्याने मुंबापुरी अक्षरश: पाण्याखाली गेल्याचा भास झाला. महापालिका क्षेत्रात २४ वॉर्ड असून २२२ ठिकाणे पाणी तुंबण्याच्या जागा आहेत. पावसाने जराही उसंत न घेतल्याने सकाळपर्यंत पाण्याचा निचरा झाला नाही. परिणामी ६३ ठिकाणी पाणी तुंबल्याचे आढळून आले.
लोकलच्या तिन्ही मार्गांवर पाणी ट्रॅकवर आल्याने लोकल ठप्प झाली. पण रस्त्यावरच्या वाहतुकीला पाणी तुंबल्याने फटका बसला. पाणी निचरा करण्यासाठी १७० पंप चालू होते. १२ ठिकाणी भिंत कोसळल्याचे पालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन कक्षाकडून सांगण्यात आले.
सकाळी शहरभर वाहतूक ठप्प असताना दुपारच्या ४.४७ मीटर उंच लाटा उसळणाऱ्या मोठ्या भरतीने आणखी नुकसान होण्याची भीती नागरिकांना वाटत होती.
शहरातील हिंदमाता, सायन, परळ, एलफिन्स्टन, कुर्ला, चेंबूर या सखोल भागातील घरात पाणी शिरले होते. सकाळी ९च्या सुमारास राज्याचे मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय यांनी सरकारी कर्मचाऱ्यांना सुट्टी जाहीर केली. तसेच महापालिका आयुक्त अजोय मेहता यांनी नागरिकांना घराबाहेर न पडण्याचे आवाहन केले. लागलीच नवी मुंबई, ठाणे, मुंबई शहरातील सर्व शाळांना सुट्ट्या जाहीर केल्या. त्यामुळे शहरातील व लोकल स्टेशनमधील गर्दी टळली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपत्कालीन व्यवस्थापन कक्षास भेट देऊन परिस्थितीची माहिती घेतली.
पुढील स्लाइडवर क्लिकवर संकटकाळातही राजकारणाला ऊत; वाचा... नेत्यांचे बोल