आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंबई काँग्रेसच्या बैठकीत धुमशान; आरोप-प्रत्यारोप, घोषणाबाजी अन् धरणे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- लोकसभा निवडणुकीत सपाटून मार खाल्ल्यानंतर पराभवाचे चिंतन करण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या काँग्रेसच्या बैठकीत चर्चेऐवजी राडेबाजीच सुरू असल्याचे दिसून येत आहे. आरोप-प्रत्यारोपांच्या खेळामुळे ही बैठक एक धुमशान झाल्याचा प्रकार शनिवारीही दिसून आला. विशेष म्हणजे एक गुरुदास कामत सोडले, तर मिलिंद देवरा, एकनाथ गायकवाड प्रिया दत्त व संजय निरुपम यांनी या बैठकीला दांडी मारली.

मंत्रालयासमोरील टिळक भवन येथे आयोजित करण्यात आलेल्या या बैठकीत दक्षिण मुंबईतील लोकप्रतिनिधी, पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मिलिंद देवरांविरोधात तक्रारीचा पाढा वाचला. देवरा लोकांना तर भेटत नाही, शिवाय कार्यकर्त्यांशीही ते संवाद साधत नाहीत. लोकांची कामेच होणार नसतील, तर काँग्रेसला लोकांनी मते का द्यावीत, असा सूर कार्यकर्त्यांनी लावला. दक्षिण मध्य मुंबईत एकनाथ गायकवाड यांना तिकीट देऊन पक्षo्रेष्ठींनी मोठी चूक केली. चंद्रकांत हंडोरे, जगन्नाथ शेट्टी, कालिदास कोळंबकर या सर्व आमदारांनी गायकवाडांच्या कार्यपद्धतीबाबत आपली नाराजी व्यक्त केली.

एकनाथ गायकवाड यांनी पाच वर्षे दक्षिण मध्य मुंबईत कामे केली नाहीत. त्यांचे आपल्या मतदारसंघांवर लक्ष नव्हते. यामुळे मतदार प्रचंड नाराज होते, असा तक्रारीचा पाढा काँग्रेसच्या आमदारांनी मांडला. त्याला कार्यकर्त्यांनी दुजोरा दिला. या बैठकीला गायकवाड यांच्या कन्या व महिला बालकल्याण मंत्री वर्षा गायकवाडही हजर होत्या. आपल्या वडिलांवर होत असलेले आरोप शांतपणे ऐकून घेण्यावाचून त्यांच्यासमोर पर्याय दिसला नाही. उत्तर पूर्व मुंबई मतदारसंघाच्या चर्चेत तर एकच गोंधळ उडाला. एकूणच सर्वच नेते एकमेंकांवर कुरघोडी करत असल्याचे पाहायला मिळाले.

मिरांडा यांच्यावर कारवाई करा
वस्त्रोद्योग व अल्पसंख्याक मंत्री नसीम खान, आमदार कृपाशंकरसिंग व नगरसेवक प्राइम मिरांडा या लोकप्रतिनिधींनी प्रिया दत्त यांचा मनापासून प्रचारच केला नाही, अशी तक्रार केल्यानंतर दोन्ही बाजूंकडून एकच घोषणाबाजी झाली. कृपाशंकर यांचे उजवे हात समजले जाणार्‍या मिरांडा यांनी ट्विटरवरून प्रिया दत्त यांच्याविरोधात प्रचार केला. त्यांच्यावर तत्काळ कारवाई करा, अशी मागणी करत प्रियांच्या सर्मथकांनी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे व मुंबई अध्यक्ष जनार्दन चांदूरकरांसमोर धरणे धरत जोरदार घोषणाबाजी केली. शेवटी मिरांडावर कारवाई करण्यात येईल, असे स्पष्ट केल्यानंतर कार्यकर्ते जागेवरून उठले.