आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंबईचे पोलिस आता सायकलवरून घालणार गस्त

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - अत्याधुनिक तंत्रज्ञानाने हायटेक झालेल्या युगात मुंबई पोलिस आता जुन्या पाेलिसांप्रमाणे चक्क सायकलवर गस्त घालताना दिसतील. शारीरिक तंदुरुस्ती राखणे आणि अरुंद आडगल्ल्या किंवा समुद्रकिनाऱ्यांवर जिथे एरवी नजर ठेवणे शक्य होत नाही, अशा अडगळीच्या ठिकाणी गस्त घालणे या उद्देशाने पाेलिसांनी हा पर्याय स्वीकारला अाहे. सध्या प्रायोगिक तत्त्वावर सुरू असलेल्या या उपक्रमाचे चांगले परिणाम दिसल्यास संपूर्ण मुंबईतल्या पोलिस ठाण्यांमध्ये सायकलींचे वाटप केले जाणार आहे.

मुंबई पोलिसांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर झालेला अाहे. त्यांचे मानसिक आणि शारीरिक आरोग्य उत्तम राहावे यासाठी अनेक उपाययोजना राबवल्या जात आहेत. भरतीच्या वेळी एकदम तंदुरुस्त असणाऱ्या पोलिसांच्या पोटाचा घेर पुढील पाच-सात वर्षांत कमालीचा वाढतो. ही बाब लक्षात घेऊन त्यांच्या कामाच्या वेळेतच अनायासे शारीरिक व्यायाम घडावा यासाठी अाता या कर्मचाऱ्यांना अत्याधुनिक सायकलींचे वाटप करण्यात येणार आहे. या सायकलींवरून आपल्या परिसरात गस्त घातल्याने गुन्ह्यांच्या प्रमाणात घट तर होईलच शिवाय शारीरिक व्यायामही होईल.

साखळी चाेरांसह समुद्र किनाऱ्यांवर लक्ष
चेनस्नॅचिंगसारख्या घटना दिवसेंदिवस वाढत अाहेत. पाेलिसांनी नियमित गस्त घातल्यास अशा अाराेपींना अाळा घालणे शक्य हाेऊ शकते. त्यामुळे अत्याधुनिक सायकलवरील गस्तीने छाेट्या गल्ल्या, समुद्र किनारे, अडगळीचे परिसर या भागातही काटेकाेर नजर ठेवणे शक्य हाेणार अाहे. सध्या दादर, जुहू आणि गिरगावचे डी. बी. मार्ग या ठाण्यांना सायकलींचे वाटप करण्यात आले आहे. यापैकी काही सायकली विशेषकरून समुद्र किनाऱ्यांवर चालवण्यासाठी तयार करण्यात आल्या अाहेत. या अत्याधुनिक सायकलींची किंमत प्रत्येकी आठ हजार इतकी आहे. या सायकली चालवण्याचे वेगळे प्रशिक्षणही पाेलिसांना देण्यात आले आहे.
पोलिस ठाण्यांसाठी इन्व्हेेस्टीगेशन फंड
राज्यातीलपोलिस ठाण्यांमधील गुन्हा सिद्धतेचे प्रमाण वाढावे यासाठी गृह विभागाने प्रयत्न सुरू केले अाहेत. त्याचाच एक भाग म्हणून प्रत्येक पोलिस ठाण्यांना इन्व्हेस्टीगेशन फंड देण्याचा निर्णय घेण्यात अाला. गृहविभागाचे प्रधान सचिव भुषणकुमार उपाध्याय यांनी ही माहिती दिली. सर्व प्रकारच्या गुन्ह्यांची नोंद करणे पाेलिस ठाण्यांना बंधनकारक करण्याचे अादेश देण्यात अाले अाहेत. गृह विभागाच्या निधीतून २५ कोटी रुपये तपासाच्या कामावर खर्च करण्यात येणार अाहेत. त्यासाठी लहान ठाण्यांना ५० हजार तर मोठ्या ठाण्यांना लाख रुपये देण्यात येणार आहेत. हे पैसे कसे कुठे खर्च झाले याची माहिती, संबंधित वरिष्ठ पोलिस निरीक्षकांकडून वेळच्यावेळी घेण्यात येईल, असेही उपाध्याय यांनी सांगितले.
^सध्या प्रायोगिक तत्त्वावर सुरू असलेल्या या उपक्रमांतर्गत समुद्र किनाऱ्यांवर गस्तीला सुरुवात केली आहे. या उपक्रमामुळे पोलिसांचा शारीरिक व्यायामही होईल, शिवाय प्रदूषणालाही आळा बसेल.- देवेनभारती, पोलिस सहआयुक्त
बातम्या आणखी आहेत...