आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महाराष्ट्र घडतोय: सुराज्य रथावर स्वार होऊन भाजप करणार कामांचा प्रसार!

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- राज्यातील फडणवीस सरकारला दोन दिवसांनी दोन वर्षे पूर्ण होत असताना भाजपने वर्षांच्या कामाचा महिने जाेरदार प्रचार-प्रसार करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी खास सुराज्य रथ तयार करण्यात आला असून त्यावर १२ स्क्रीन बसवण्यात आले असून हा रथ शहरांबरोबर ग्रामीण भागातही घोडदौड करेल. आगामी नगर पंचायत निवडणुकीच्या प्रचाराच्या दृष्टीने भाजपने ही रणनीती आखली आहे.

या प्रचार-प्रसारासाठी भाजपकडून िजल्हास्तर ते मंडळस्तर अशी समिती नियुक्त केली आहे. सरकारला दोन वर्षे पूर्ण होत असल्याबद्दल सरकारने आपल्या कामाची खरे तर आधीच जोरदार तयारी सुरू केली होती. महाराष्ट्र घडतोय, या टॅगलाइनखाली फडणवीस त्यांच्या सहकारी मंत्र्यांनी केलेल्या कामांचा प्रसारमाध्यमांमधून प्रचार करण्याचे निश्चित झाले होते. तशा जाहिरातीही सर्वत्र प्रकाशित होण्यास सुरुवात झाली असताना अचानक नगर पंचायतीच्या निवडणुका जाहीर झाल्याने भाजपच्या मनसुब्यांवर पाणी फिरले. पण यामधून आता सुराज्य

रथाचा मार्ग काढण्यात आला आहे.
काँग्रेस आघाडी सरकारच्या १५ वर्षांच्या कार्यकाळात झाली नाहीत इतकी कामे युती सरकारने दोन वर्षांत केल्याचा दावा मुख्यमंत्री तसेच प्रदेशाध्यक्ष दानवे यांनी केला असून याच कामांची माहिती रथावरील स्क्रीनवरून जनतेपर्यंत पोहोचवण्यात येतील, अशी माहिती आमदार मंगलप्रभात लोढा यांनी दिली. प्रचार-प्रसारासाठी नियुक्त करण्यात आलेल्या समितीचे लोढा हे अध्यक्ष असून या समितीत जिल्हा मंडळ स्तरावर दोन सदस्यांचा समावेश असेल. नोव्हेंबर ते जानेवारीदरम्यान सुराज्य रथ गावखेडी तसेच शहरांमध्ये फिरणार असून या रथाचा कार्यक्रम समितीचे सदस्य जिल्हा मंडळ स्तरावरील पदाधिकारी कार्यकर्त्यांशी चर्चा करून तयार करणार आहेत. या कार्यक्रमामुळे ग्रामीण भागातील कार्यकर्ते मुख्य प्रवाहात येतील, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.

“मुश्किल’वर रथाचा उतारा
गेलेदोन महिने सुरू असलेल्या मराठा क्रांती मोर्चांमुळे सरकारसमोर माेठे आव्हान निर्माण झाले आहे. राज्यात सर्वात मोठ्या संख्येने असलेला हा समाज स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये आपल्या विरोधात जाऊ शकतो का, या शंकेने भाजप नेत्यांची सध्या झोप उडाली आहे. त्यातच “ए दिल है मुश्किल’ या चित्रपटावरून मुख्यमंत्री, मनसे अध्यक्ष राज ठाकरे तसेच निर्माता दिग्दर्शक करण जोहर यांच्यातील चर्चेवरून राज्य सरकारवर टीकेची झोड उठवली गेली. यावर सुराज्य रथ ही मात्रा असेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

सेनेच्या कामांचा उल्लेख होणार नाही
सुराज्यरथावरून सरकारच्या कामांची लोकांपर्यंत माहिती पोहोचवली जाणार असली तरी त्यात शिवसेनेच्या कामांचा मात्र उल्लेख केला जाणार नाही. भाजप मंत्र्यांनी केलेल्या कामांची माहिती स्क्रीनवरून दिली जाईल. तीन महिने प्रचार करण्याचे मुख्य कारण असेल ते नगर पंचायतींनंतर होणाऱ्या महापालिका निवडणुका. मुंबई, ठाणे अशा महत्त्वाच्या महापालिका ताब्यात घेण्याचे भाजपचे लक्ष्य असून जानेवारीपर्यंत हा रथ सर्वत्र फिरल्यास फेब्रुवारीत होणाऱ्या महापालिका निवडणुकांसाठी याचा फायदा होईल, अशी व्यूहरचना आहे. मुंबई, ठाण्यासह फेब्रुवारीत नाशिक, पिंपरी चिंचवड, पुण्याच्या महापालिका निवडणुका होणार आहेत.
बातम्या आणखी आहेत...