आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंबई महापालिका निवडणुकीसाठी राष्ट्रवादीला उमेदवार मिळेनात

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- मुंबई महापालिकेच्या अागामी निवडणुकीच्या तयारीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसने इच्छुक उमेदवाराची चाचपणी करण्यास सुरुवात केली आहे. त्यासाठी उमेदवारी अर्जाचे वितरण मंगळवारपासून मुंबई राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयातून सुरू झाले. मात्र पहिल्या दिवशी फक्त १६ इच्छुकांनी अर्ज घेतले आहेत.

मुंबई महापालिकेची निवडणूक फेब्रुवारीत होणार असून सर्व पक्षांनी तयारी सुरू केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसही त्यात मागे नाही. एेन वेळेला काँग्रेसशी आघाडी झाल्यास स्वबळावर निवडणूक लढता यावी याची चाचपणी राष्ट्रवादी काँग्रेस करत आहे. या पार्श्वभूमीवर इच्छुकांना अर्जाचे वाटप मंगळवारपासून सुरू झाले. हे अर्ज वाटप पंधरा दिवस चालणार असून त्यामुळे इच्छुकांची संख्या वाढेल, असा विश्वास राष्ट्रवादीच्या एका वरिष्ठ नेत्याने व्यक्त केला.

पहिला दिवस असल्याने कार्यकर्ते कमी प्रमाणात आले, असेही त्यांनी सांगितले. मात्र ही संख्या वाढत जाईल. राष्ट्रवादी काँग्रेसची मुंबईतली ताकद ही जेमतेम आहे. सध्या मुंबई महापालिकेत राष्ट्रवादीचे केवळ १३ नगरसेवक आहेत. ती संख्या टिकवण्याची कसरत राष्ट्रवादीला करावी लागणार आहे. त्यात अजूनही आघाडीबाबत कोणताही निर्णय झालेला नाही. शिवाय मुंबईत शिवसेना आणि भाजपमध्येच थेट लढत होण्याची चिन्हे असल्याने राष्ट्रवादी पक्ष काँग्रेसबरोबर आघाडी करण्याच्या तयारीत आहेत. मात्र काँग्रेसचा शेवटपर्यंत निर्णय नसल्याने या परिस्थितीत राष्ट्रवादीच्या उमेदवारीवर निवडणूक लढवल्यास कितपत यश मिळेल याबाबत इच्छुक साशंक आहेत. दरम्यान, या निवडणुकीत काॅंग्रेसशी अाघाडी करायची की नाही याबाबत कार्यकर्त्यांत संभ्रम अाहे.

पहिल्या दिवशी वितरित झालेले अर्ज : ओबीसी-०२, महिला- ०४, खुला प्रवर्ग- ९, अनुसूचित जाती-जमाती- २.
बातम्या आणखी आहेत...