आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Mumbai Court To Announce Punishment For Men Guilty Of Photojournalist's Gang rape

पत्रकार तरुणीवर गँगरेप, आरोपींना आज शिक्षा शक्य

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - मुंबईच्या शक्ती मिल परिसरात ऑगस्ट 2013 मध्ये छायाचित्रकार तरुणीवर झालेल्या सामूहिक बलात्कार प्रकरणातल्या चारपैकी तीन आरोपींवर ‘हॅबिच्युअल ऑफेंडर’ कलमान्वये सुनावणी करण्याची सरकारी वकिलांची मागणी सत्र न्यायालयाने मान्य केली आहे. मात्र हे कलम लावण्यास बचाव पक्षाच्या वकिलांनी विरोध केल्यामुळे मंगळवारी या प्रकरणी आरोपींना शिक्षा सुनावली जाण्याची शक्यता आहे.

शक्ती मिल परिसरात 22 ऑगस्ट 2013 ला छायाचित्रकार तरुणीवर सामूहिक अत्याचार केल्याप्रकरणी विजय जाधव, कासीम बंगाली आणि मोहंमद सलीम या तीन आरोपींवर कलम 376 (इ) अंतर्गत ‘हॅबिच्युअल ऑफेंडर’ म्हणजेच सराईत गुन्हेगार म्हणून कठोर शिक्षा देण्याची सरकारी पक्षाची मागणी आज न्यायालयाने मान्य केली. याबाबत युक्तिवाद करताना अँड. निकम यांनी या तीन आरोपींना दोनच दिवसांपूर्वी एका टेलिफोन ऑपरेटरवर बलात्कार केल्याप्रकरणी सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.

याच आरोपींनी महिनाभरात पुन्हा तशाच स्वरूपाचा गुन्हा केला म्हणून या कलमांतर्गत आरोपींना फाशी देण्याची मागणी त्यांनी केली. गुन्हा सिद्ध झाल्यास जन्मठेप किंवा फाशीची तरतूद या कलमात आहे. मात्र शिक्षा सुनावलेल्या आरोपीला हे कलम लावता येत नाही, असा युक्तिवाद आरोपींचे वकील अँड. प्रकाश सालसिंगीकर यांनी केला. त्यावर याबाबत आपले म्हणणे मंगळवारी सुनावणीदरम्यान मांडण्याची परवानगी न्यायालयाने आरोपींच्या वकिलांना दिली आहे. त्यानुसार उद्या आरोपींचे वकील आपली बाजू मांडतील. आरोपीच्या वकिलांची बाजू न्यायालयाला न पटल्यास 376 ई या कलमान्वये आरोपींवर आरोप निश्चित केले जातील आणि आरोपींना शिक्षा सुनावली जाईल, अशी माहिती सरकारी वकील अँड. उज्ज्वल निकम यांनी दिली. तसे झाल्यास या कलमांतर्गत शिक्षा सुनावली जाण्याची ही देशातली पहिलीच वेळ असेल.