आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मराठा आरक्षणाच्या लढाईत मुंबईच्या डबेवाल्यांची उडी!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - मराठा आरक्षणाच्या लढाईत आता मुंबईच्या डबेवाल्यांनीही उडी घेतली असून त्यांच्यासाठी 9 मे रोजी दादरमध्ये मराठा आरक्षण मेळावा आयोजित केला आहे. या मेळाव्याला शिवसेना-भाजप महायुतीचे प्रमुख नेते गोपीनाथ मुंडे, सुभाष देसाई, रिपब्लिकन पक्षाचे रामदास आठवले, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी, महादेव जानकर, शिवसंग्रामचे विनायक मेटे आदी उपस्थित राहणार आहेत.

मुंबईतील बहुतांशी डबेवाले हे मावळमधील मराठा असून 125 वर्षांपासून ते मुंबईकरांना जेवणाचे डबे पुरवत आहेत. ‘मॅनेजमेंट गुरू’ म्हणून नावलौकिक मिळूनही राज्य सरकारकडून मराठा समाजाला शिक्षण, नोकरी, घर अशा कोणत्याच सुविधा दिल्या जात नाहीत. अशा प्रकारच्या अनेक बाबी सरकारच्या निदर्शनास आणून देण्यासाठी शिवसंग्राम संघटनेच्या माध्यमातून लढा उभारण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे मुंबई जेवण डबे वाहतूक मंडळाचे प्रभारी सचिव गंगाराम तळेकर यांनी सांगितले. शिवसंग्राम तसेच मुंबई जेवण डबे वाहतूक मंडळाने मंगळवारी पत्रकार परिषद घेऊन 9 मेच्या मेळाव्याची घोषणा केली.

या मेळाव्यात शिवसंग्रामचे प्रदेश अध्यक्ष तानाजीराव शिंदेही मार्गदर्शन करणार आहेत. महाराष्ट्र विधान परिषदेचे विशेष अधिवेशन 8 मे रोजी होणार असून या अधिवेशनात विधान परिषदेच्या सभापतींची निवड होणार आहे. याच अधिवेशनात मराठा आरक्षणाचाही निर्णय जाहीर करावा, अशी मागणी या वेळी शिवसंग्राम संघटनेकडून करण्यात आली.

मराठय़ांच्या नाराजीचा राष्ट्रवादीला फटका
राष्ट्रवादी काँग्रेेसचे अध्यक्ष शरद पवारांनी नुकतीच लोकसभा निवडणुकीची आढावा बैठक घेतली. आरक्षणाच्या मुद्दयावरून मराठा समाजाच्या नाराजीचा फटका राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांना बसला. विधानसभा निवडणुकीतही याचे परिणाम दिसण्याची शक्यता असल्यामुळे हा प्रश्न लवकरच सोडवावा लागेल, असे मत शरद पवार यांनी या बैठकीत व्यक्त केल्याचे बोलले जात आहे.