आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मध्यरात्री सायकलवरून ‘मुंबई दर्शन’ची अनाेखी संधी!; प्रियांक देशमुख आणि योगेश चंदे यांची कल्पना

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- मुंबई शहराला स्वत:चा वैभवशाली इतिहास, वर्तमान आणि भविष्य आहे. मायानगरीचा इतिहास जाणून घेण्यासाठी हेरिटेज वॉक काढले जातात. मात्र, यापेक्षा एक अनोखी कल्पना प्रियांक देशमुख व योगेश चंदे या दोन तरुणांनी शोधून काढली आहे.
 
मुंबईच्या विशिष्ट भागातील महत्त्वाच्या वास्तू, रस्ते तसेच त्या वास्तूंशी निगडित महत्त्वाच्या व्यक्ती यांच्याविषयीच्या कथा सोबत असलेल्या इतिहासप्रेमींना सांगत मध्यरात्रीपासून पहाटेपर्यंत भटकंती करायची तीदेखील सायकलने. “द लिजंड ऑफ बॉम्बे बार्ड््स’ या नावाने ओळखल्या जाणाऱ्या या रपेटीला मुंबईकरांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.  

गेल्यावर्षी डिसेंबर महिन्यात प्रियांक व योगेश ४० दिवस लेह-लडाखला दुचाकीने भ्रमंती करून आले. तिथे त्यांनी ज्या ज्या ठिकाणी भेटी दिल्या तेथील कथा त्यांना स्थानिक रहिवाशांकडून ऐकायला मिळाल्या. त्यामुळे त्यांना मुंबईतील विविध  ठिकाणचे ऐतिहासिक महत्त्व लोकांना समजावून सांगण्याची कल्पना सुचली. मध्यरात्री जास्त वर्दळ नसल्याने सायकलवरून फेरफटका मारायचा, असे त्यांनी ठरवले. प्रियांकने सांगितले, मुंबईचा इतिहास समजावून सांगण्यासाठी आधी मुंबईवरच्या अनेक पुस्तकांचा अभ्यास केला. त्यानंतर  सर्वप्रथम कुलाबा भागाची निवड केली. त्या भागात असणाऱ्या महत्त्वाच्या वास्तू, त्यांच्या कथा निवडल्या. या वास्तू ज्यांनी बांधल्या त्या पूर्वी एका कर्तृत्ववान माणसाभोवती गुंफल्या. काही दिवसांपूर्वी “द लिजंड ऑफ बॉम्बे बार्ड््स’ असे शीर्षक धारण करून व पोलिसांची रीतसर परवानगी घेऊन कुलाबा भागात मध्यरात्री सायकलिंग करत पहिल्यांदाच आमच्या बरोबरच्या इतिहासप्रेमी लोकांना त्या त्या वास्तूचा इतिहास कथांच्या माध्यमातून समजावून सांगितला. आमच्यासोबत आलेल्या लोकांना आम्हीच सायकल पुरवतो, असेही तो म्हणाला.   

माहिम, दादर भागात लवकरच भ्रमंती   
या प्रकारे मध्यरात्री सायकलिंग करत कथा सांगत मुंबईचे स्थळदर्शन याआधी कोणीही केलेले नाही. ही संकल्पना आवडल्याने कुलाबा भागात आम्ही आजवर पाच वेळा अशा प्रकारे भ्रमंती केली आहे. यानंतर आम्ही माहिम, दादर, भायखळा भागातही “द लिजंड ऑफ बॉम्बे बार्ड््स’ची सायकलिंग करणार आहोत. त्या त्या परिसरातील वास्तूंच्या कथा व महान व्यक्तींचे त्या परिसरातील वास्तव्य अशी माहिती गोळा करण्याचे काम सध्या सुरू असल्याचे देशमुख याने सांगितले.
बातम्या आणखी आहेत...