आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंबईचा विकास आराखडा; भाजप-सेनेत तू तू-मी मी!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - मुंबईचा नवीन विकास आराखडा तयार करण्याचे काम मे. ग्रुप एससीई कंपनीला देण्यात आले होते. प्रत्यक्षात मे. इजीस जिओ प्लॅन या कंपनीने हा प्लॅन तयार केला. त्यामुळे हा विकास आराखडाच अवैध आहे. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची चौकशी माजी सनदी अधिकाऱ्यांच्या समितीमार्फत करावी, अशी मागणी भाजप आमदार आशिष शेलार यांनी विधानसभेत करत शिवसेनेला पुन्हा एकदा लक्ष्य केले.
मुंबईच्या विकास आराखड्यात महापालिकेने प्रस्तावित केलेली उद्दिष्टे साध्य झालेली नाहीत. शिवाय जनतेत आराखड्याबाबत प्रचंड भीतीचे आणि संभ्रमाचे वातावरण आहे. अशा वेळी गैरपद्धतीचा आधार घेत तयार करण्यात आलेल्या या आराखड्याची चौकशी झालीच पाहिजे, असे शेलार यांनी सांगितले.
एवढेच नाही तर आराखडा तयार करताना आणखीन सूचना आणि हरकती मागवण्याची आवश्यकता आहे. शिवाय, हा विकास आराखडा मराठीत प्रकाशित केला पाहिजे, अशीही मागणी शेलार यांनी केली. त्यावर चौकशी कराच. दूध का दूध पानी का पानी होऊन जाऊ दे, असे माजी महापौर आणि आमदार सुनील प्रभू यांनी सभागृहात चर्चेदरम्यानच शेलारांना सुनावले.

शिवसेनेचे आमदार सुनील प्रभू यांनी चौकशीच्या मागणीचा चांगलाच समाचार घेतला. जर चौकशी करायची असेल तर खुशाल करा. शेलार यांनी केलेले आरोप गंभीर असून त्याची चौकशी करुन त्याविषयीचे सत्य मुंबईकरांना समजलेच पाहिजे. तेव्हा मुख्यमंत्र्यांनी चौकशीची घोषणा करावीच, असे सांगत प्रभू यांनी चेंडू भाजपच्या कोर्टात टाकला.
मुंबईवर विशेष अधिवेशन घ्या : विखे

मुंबईच्या विकास आराखड्याबाबत मोठ्या प्रमाणात संभ्रम आहे. हा आराखडा बिल्डरधार्जिणा आहे. त्यामुळे यावर सविस्तर चर्चा होणे गरजेचे आहे. त्यासाठी तीन दिवसांचे विशेष अधिवेशन बोलवावे, अशी मागणी विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली. हा विकास आराखडाच नष्ट करावा व तो नव्याने करावा, अशी मागणी छगन भुजबळ यांनी केली. मुंबईच्या विकासावर विशेष अधिवेशन बोलवण्याच्या मागणीचे सुनील प्रभूंनी समर्थन केले.