आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मदतकार्य संपले; ‘डॉकयार्ड’चे बळी 61 वर, सात अधिकारी निलंबित

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- डॉकयार्ड येथे कोसळलेल्या इमारतीचा ढिगारा बाजूला करण्याचे काम रविवारी सकाळी संपले. 48 तास चाललेल्या बचावकार्यात 61 मृतदेह हाती लागले.
दरम्यान, महापालिकेने 7 अधिकारी तडकाफडकी निलंबित केले असून 18 जणांची चौकशी सुरू केली आहे. या दुर्घटनेच्या चौकशीसाठी पालिकेने अतिरिक्त आयुक्त राजीव जलोटा व अतिरिक्त आयुक्त मोहन अडताणी यांची समिती स्थापन केली. कोसळलेली इमारत बाजार खात्याच्या अखत्यारित होती त्यामुळे या खात्याचे सहायक आयुक्त चंद्रशेखर चोरे यांच्या निलंबनाबाबत अधिक माहिती तपासून घेतला जाणार आहे. इमारतीतील 22 कुटुंबातील सर्व 99 व्यक्तींची मोजदाद पूर्ण झाली असून कोणीही बेपत्ता नाही. इमारतीचा 500 टन राडारोडा बाँबे पोर्ट ट्रस्टच्या जागेत टाकण्यात आलो. यात दुर्घटनाग्रस्त कुटुंबीयांच्या किमती वस्तू असण्याची शक्यता आहे. त्यामुळे तेथे सीसीटीव्ही लावले आहेत.

दरम्यान, ‘मंत्रालयाचे एजंट असलेले पालिका आयुक्त सीताराम कुंटे दुर्घटनेला जबाबदार असून, त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा’, अशी मागणी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केली.

दरम्यान, या दुर्घटनेप्रकरणी सोमवारी जबाबदार अधिकाºयांवर कारवाई होऊ शकते, अशी माहिती महापालिकेच्या सूत्रांनी ‘दिव्य मराठी’ला दिली.