आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तगड्या जनसंपर्काची लढत प्रभावी लोकप्रतिनिधीशी!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - उत्तर मुंबई हा भाजपचा दशकापूर्वीचा बालेकिल्ला. 2004 मध्ये अभिनेता गोविंदा यांनी राम नाईकांना पराभूत करून ही परंपरा मोडीत काढली आणि नंतर कॉँग्रेसच्या संजय निरुपम यांनी मनसेमुळे झालेल्या मतविभागणीचा फायदा घेत विजय मिळवला. मात्र पाच वर्षांत पुलाखालून पाणी वाहून गेले आहे. नरेंद्र मोदी लाट आणि राज ठाकरेंनी मोदींना दिलेल्या पाठिंब्याने भाजपचे उमेदवार गोपाळ शेट्टी यांचे पारडे जड झाले असून युतीच्या बालेकिल्ल्याला विजयाची जाग आल्यासारखे वाटते.

यंदाही मनसेच्या आशेवर निरुपम हे निश्चिंत होते. मात्र आता त्यांच्यापुढील आव्हान कठीण झाले आहे. असे असले तरी पूर्वार्शमीचे शिवसैनिक असलेल्या निरूपम यांनी समाजातल्या शेवटच्या घटकांशी नाळ घट्ट आहे. गेल्या पाच वर्षांत 20 कोटी निधीचा 100 टक्के वापर करत त्यांनी व्होटबँक तयार केली आहे. केवळ गांधी घराण्याच्या जादूवर विसंबून राहण्याची चूक त्यांनी केलेली नाही. विकासकामांच्या जोरावर ते लढायला सज्ज आहेत.

खरे तर उत्तर मुंबईची ही लढत म्हणजे दोन जातिवंत कार्यकर्त्यांची असेल. 1992 पासून नगरसेवक असलेल्या गोपाळ शेट्टींनी त्यानंतर मागे वळून बघितलेले नाही. 1992 ते 2004 पर्यंत नगरसेवक आणि 2004 पासून आमदार असा अथक प्रवास करणार्‍या शेट्टींनी उद्याने, बगिचे, मैदाने विकसित करत संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाशेजारची बोरिवली खर्‍या अर्थाने सुंदर व स्वच्छ बनवली.

शिवसेना-भाजपचे लोकप्रतिनिधी मध्यम व उच्च वर्गामध्ये व्होटबँक फिक्स करत असताना निरूपम यांनी मात्र चाळी व झोपडपट्टय़ांमध्ये प्रभावी काम केले आहे. 12 हजार 74 शौचालये बांधत निरूपम यांनी जणू एक विक्रमच केला आहे. ही कामे खासदारांची असतात का? नगरसेवकांनी ही कामे करायला हवीत. निरुपम हे शौचालय खासदार आहेत, असा टिंगलीचा सूर विरोधक लावतात. पण, त्याची या खासदाराला पर्वा नाही. 300 बोअरवेल, मुस्लिमबहुल मालवणी परिसरात 60 लाखांची पाणी योजना तसेच 7 बगिचे आणि अडीच लाख लोकांची वैयक्तिकरीत्या केलेल्या कामांनी बांधला गेलेला कायमस्वरूपी मतदारसंघ यामुळे प्रतिकूल वातावरणातही निरुपमांचे तगडी लढत देण्याचे हौसले बुलंद आहेत.