आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Mumbai Fire Brigade: Colleagues Bid Adieu To Sanjay Desai

आगीशी झुंजण्यासाठीच माझा जन्म, मला वीरमरण यावे- शहीद देसाईंची होती इच्छा!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- आपला जन्म आगीशी झुंजण्यासाठीच झाला आहे. आपल्याला वीरमरण यावे अशी इच्छा खुद्द काळबादेवी आगीत शहीद झालेल्या महेंद्र देसाई यांची होती. 2008 साली मुंबईत झालेल्या 26/11 दहशतवादी हल्ल्याच्या घटनेनंतर देसाई यांनी आपल्या कुटुंबियांसमोर अशी इच्छा बोलून दाखवली होती. दुर्दैवाने नियतीने त्यांची इच्छा अखेर पूर्ण केलीच. देसाई हे कर्तव्यनिष्ठ तसेच कडक शिस्तीचे अग्निशमन अधिकारी होते. नियतीने त्यांची इच्छा पूर्ण केली तर देसाई हे आपल्या कुटुंबियांना अर्ध्या प्रवासात सोडून दूरवर निघून गेले आहेत.
मुंबईतील काळबादेवी भागातील गोकुळ इमारतीला लागलेल्या आगीत भायखळ्याच्या ब्रिगेड केंद्राचे प्रमुख महेंद्र देसाई शहीद झाले. देसाई यांच्यामागे त्यांची 80 वर्षाची वृद्ध आई, पत्नी मानसी देसाई, मुलगी शिवानी तर मुलगा चिन्मय असा परिवार आहे. देसाई कुटुंबियांसह हे एका सरकारी वसाहतीत राहत होते. मात्र त्यांच्या निधनानंतर त्यांच्या कुटुंबियांचा आधारवड कोसळला आहे. देसाई यांची मुलगी शिवानी ही एमबीबीएसच्या पहिल्या वर्षात शिकत आहे तर मुलगा चिन्मय हा दहावीला आहे.
देसाई यांच्या कुटुंबियांची राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला व मुलगा अमित यांनी रविवारी भेट घेतली. त्यावेळी मानसी देसाईंनी त्यांच्यापुढे टाहो फोडला. माझ्या मुलांच्या भविष्याचा प्रश्न मला सतावत आहे. मी गृहिणी आहे, आता पतीच्या निधानाने घरात कोणीही कमावता नाही. मुलगी एमबीबीएसला आहे तर मुलगा दहावीत आहे. त्याच्या भविष्याचा प्रश्न मला पडला आहे. सरकारने मला सरकारी नोकरी द्यावी व सरकारी वसाहतीतून आम्हाला बाहेर काढण्यात येऊ नये अशा भावना व्यक्त केल्या.
देसाई याआधीही 40 टक्के भाजले होते- काही महिन्यांपूर्वी मुंबईतील गवाला टॅंकला आग लागली होती. त्या घटनेत देसाई हे 40 टक्के भाजले होते. मात्र, भाजलेली जखम सुकण्यापूर्वीच ते कामावर हजर झाले होते. जखम असताना कॉलवर जाऊ नका व फारसे फिरू नका. जखमेवर आगीचा लोळ आल्यास जंतूसंसर्ग होईल असे डॉक्टरांनी बजावल्यानंतरही देसाई कर्तव्य पार पाडत होते. आगीशी झुंजण्यासाठीच आपला जन्म झाला आहे असे ते बोलून दाखवायचे. देसाई यांनी अखेरचा श्वासही आगीतच घेतला व त्यांनी बोललेले शब्द खरे ठरले.
नेसरीकर, अमीन यांची मृत्यूशी झुंज सुरूच
‘गोकुळ’ दुर्घटनेतील गंभीर जखमी अग्निशमन दलाचे प्रमुख सुनील नेसरीकर आणि उपप्रमुख सुधीर अमीन या लढवय्या अधिकार्‍यांची मृत्यूशी झुंज सुरूच आहे. अमीन यांची दोन्ही फुफ्फुसे निकामी झाल्याने त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे तर नेसरीकर यांनाही श्‍वासोच्छ्वास घेण्यास त्रास होत आहे, असे ऐरोली येथील नॅशनल बर्न सेंटरचे वैद्यकीय अधिकारी डॉ. सुनील केसवाणी यांनी सांगितले.
अमीन आणि नेसरीकर यांना शनिवारी पहिल्यांदा मुंबईच्या मसिना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र त्यानंतर अधिक उपचारासाठी त्यांना ऐरोली येथील नॅशनल बर्न सेंटरमध्ये हलविण्यात आले. अमीन हे या आगीत 90 टक्के तर नेसरीकर 50 टक्के भाजले आहेत. या दोन्ही अधिकार्‍यांवर उपचार करण्यासाठी डॉक्टरांची एक टीम तयार करण्यात आली आहे. हे दोन्ही अधिकारी रुग्णालयात दाखल झाल्यापासून त्यांच्यावर उपचार करणार्‍या डॉक्टरांच्या टीमने फक्त दोनच तास विश्रांती घेतली आहे. त्यांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा होण्यासाठी आमच्या टीमचे जोरदार प्रयत्न सुरू आहेत, अशी माहिती डॉ. सुनील केसवाणी यांनी दिली.
पुढे वाचा, देसाईंना मिळाले होते राष्ट्रपतींच्या हस्ते शौर्यपदक...