आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिवस्मारकाचा भूमिपूजन समारंभ उधळणार, मुंबईतील मच्छीमारांचा इशारा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - अरबी समुद्रात उभारावयाच्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आंतरराष्ट्रीय स्मारकाचा पुढच्या महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार पायाभरणी समारंभ उधळून लावण्याचा इशारा मुंबईतील मच्छीमारांनी पत्रकार परिषदेत दिला आहे. शिवाजी स्मारकासाठी मुंबईच्या कफ परेड, कुलाबा समुद्रात ४२ एकर क्षेत्रात भराव टाकला जाणार आहे. त्यामुळे मुंबईतील दोन हजार यांत्रिक बोटीवरील २५ हजार मच्छीमारांचा मासेमारी व्यवसाय संकटात सापडणार आहे. म्हणूनच मच्छीमारांनी शिवाजी स्मारकास विरोध चालवला असून सदर स्मारक गिरगाव किंवा वांद्रे येथील समुद्रात करण्यात यावे, अशी मागणी त्यांनी केली आहे.

विरोधास न जुमानता स्मारकाचा पायाभरणी समारंभ करण्याचा प्रयत्न केल्यास मच्छीमार दोन हजार यांत्रिक बोटी काळे झेंडे लावून कार्यक्रमस्थळी धडकावतील. तसेच मुंबईतील शंभर मासळी मार्केटही बंद ठेवून मुंबईकरांची अडवणूक करण्यात येईल, असे अखिल महाराष्ट्र मच्छीमार संघटनेचे अध्यक्ष दामोदर तांडेल यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

अनेक संघटनांचा अांदाेलनाला पाठिंबा
आमदार विनायक मेटे यांच्या अध्यक्षतेखालील स्मारक समितीने मच्छीमारांच्या मागणीची दखल न घेतल्यास मच्छीमार केंद्रीय हरित लवाद तसेच उच्च न्यायालयात दाद मागतील, असेही तांडेल म्हणाले. मच्छीमारांच्या मागण्यांना मुंबईतील सोळा सामाजिक संघटनांसह अावाज फाउंडेशन, नरिमन पॉइंट सिटिझन ग्रुप, कुलाबा कफ परेड नागरी विकास समिती तसेच कफ परेड सिटिझन असोसिएशन या सामाजिक संघटनांचा पाठिंबा असल्याचे मच्छीमार संघटनेचे म्हणणे आहे.

काय अाहे अाक्षेप?
१९७० च्या काळात नरिमन पॉइंट येथील समुद्रात भराव घालून गगनचुंबी इमारती उभ्या केल्या. त्यामुळे मुंबईच्या िकनाऱ्यावर लाटांचे मोठे तडाखे बसत आहेत. शिवाजी स्मारकाच्या ४२ एकर भरावाने दादरची चैत्यभूमी अाणि शिवाजी पार्कच्या महापौर बंगल्यातील दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रस्तावित स्मारकाला धोका उदभवू शकतो, असेही मच्छीमार संघटनांचे सांगणे आहे.
बातम्या आणखी आहेत...