आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Mumbai High Court File Petition Of Farmers Suicide, Issued Notice To Government

शेतकरी आत्महत्यांची स्वत:हून दखल, हायकोर्टाने नोटीस देऊन सरकारला मागितले उत्तर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - वाढत्या शेतकरी आत्महत्यांबाबत चिंता व्यक्त करत मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारला नोटीस बजावली असून उत्तर मागितले आहे. शेतकरी आत्महत्यांबाबत विविध वर्तमानपत्रांतून छापून आलेल्या वृत्तांची स्वत:हून दखल घेत उच्च न्यायालयाने ही याचिका दाखल करून घेतली आहे.

गेल्या वर्षी अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे राज्यातील शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झालेले असतानाच यंदाही पावसाने ओढ दिली आहे. यंदा शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचा आकडा सहाशेपेक्षा अधिक आहे. या गंभीर परिस्थितीची दखल घेत, 'याबाबत सद्य:स्थिती काय आहे, तसेच आपण काय पावले उचलत आहोत?’ अशी विचारणा बुधवारी न्या. नरेश पाटील आणि न्या. एस.बी. शुक्रे यांनी सरकारला केली. यावर शेतकऱ्यांना आत्महत्यांपासून परावृत्त करण्यासाठी त्यांचे समुपदेशन केले जात असून शेतकऱ्यांची वीज बिले आणि कर्जाच्या हप्त्यांची वसुली थांबवल्याचे राज्य सरकारतर्फे सांगण्यात आले.

हे संकट सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या शेतकऱ्यांच्या जीवनावर गंभीर परिणाम करत असून त्यावर राज्य सरकारने दूरगामी परिणाम करणाऱ्या उपाययोजना केल्या पाहिजेत, असा सल्ला उच्च न्यायालयाने यावेळी दिला. तसेच आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबियांच्या स्थितीबाबतही न्यायालयाने यावेळी विचारणा केली. या प्रकरणाची पुढील सुनावणी ८ नोव्हेंबरला ठेवण्यात आली आहे.