आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Mumbai High Court News In Marathi, Cruel Wife, Divya Marathi

पैसे चोरण्याची सवय असणारी बायको क्रूररच, उच्च न्यायालयाचा निकाल

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - आपल्याच घरातून पैसे चोरण्याची सवय असलेली पत्नी ही क्रूरच असल्याचे मुंबई उच्च न्यायालयाने म्हटले आहे. ही सवय व डेबिट कार्ड गैरव्यवहारात तिला झालेली अटक हा पतीचा मानसिक छळच असून यामुळे तो घटस्फोट मिळवण्यासाठी पात्र असल्याचा निकाल कोर्टाने एका प्रकरणात दिला आहे.


पत्नीला घरातून पैसे चोरण्याची व चेकच्या माध्यमातून बँकेतील पैशांचा गैरव्यवहार करण्याची सवय असल्याची तक्रार पतीने घटस्फोटाच्या एका याचिकेत केली होती. अशाच एका प्रकरणात पत्नीला अटकही झाली होती, असे त्याने याचिकेत नमूद केले. त्यावर दोन्ही पक्षांची सामाजिक स्थिती पाहता, अशा प्रकारचे कृत्य हे एक प्रकारचे क्रौर्यच ठरते, असे निरीक्षण न्यायमूर्ती व्ही.एल. आचार्य व विजया ताहिलरमानी यांनी नोंदवत निकाल सुनावला. 2008 मध्येच कौटुंबिक न्यायालयाने पतीला घटस्फोट मंजूर केला होता. या निर्णयाला पत्नीने उच्च न्यायालयात आव्हान दिले होते.

मानसिक स्थिती पूर्णपणे बरी असताना अशा प्रकारचे कृत्य केल्याने पतीला तिच्या बरोबर आयुष्यभर राहणे शक्य नसल्याचे मान्य करत न्यायालयाने घटस्फोटाला मंजुरी दिली. विशेष म्हणजे या प्रकरणात महिलेच्या मुलासह कुटुंबातील सदस्यांनी पुरावे गोळा केले होते. त्यावरून महिलेला चोरी करण्याची सवय असल्याचे सिद्ध होते, असे न्यायालयाने स्पष्ट केले आहे.


पतीचे आरोप :
आपल्या पत्नीला खोटे बोलण्याची व घरातून तसेच चेकवर खाडाखोड करून बँकेतून पैसे चोरण्याची सवय आहे. तिच्याच एका सहका-याच्या डेबिट कार्डवरून तिने 37 हजार रुपये लांबवले होते. या प्रकरणात तिला अटकही झाली होती.


कोर्टाचे निरिक्षण :
डेबिट कार्डवरून पैसे चोरण्याच्या एका घटनेवरूनच पत्नीची प्रवृत्ती दिसून येते. यामुळे तिच्यासोबत राहताना पती किती मानसिक छळ, ताण-तणावात असेल याची कल्पना येते. पुढे उत्तरोत्तर तिच्या या उचापती वाढतच गेल्याचेही दिसते. त्यामुळे उद्भवणारे वाद हे संसारातील नेहमीच्या कुरबुरी नाहीत. सबब तो तिच्यापासून घटस्फोट मिळवण्यास पात्र आहे.