आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काेल्हापुरात फिरत्या खंडपीठाची शिफारस; मंत्रिमंडळाने दर्शवली अनुकूलता

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई/ काेल्हापूर- काेल्हापुरात उच्च न्यायालयाचे खंडपीठ स्थापन करावे, या काेल्हापूरकरांच्या मागणीला वाटाण्याच्या अक्षता लावत राज्य मंत्रिमंडळाने मंगळवारी या ठिकाणी फिरते खंडपीठ (सर्किट बेंच) स्थापन करण्यास अनुकूलता दर्शवली. याविषयीची शिफारस मुख्य न्यायमूर्तींना करण्यात येणार आहे.

कोल्हापूरसह साेलापूर, सातारा, सांगली, रत्नागिरी सिंधुदुर्ग या सहा जिल्ह्यांचे उच्च न्यायालयातील खटले या न्यायालयाच्या अखत्यारीत येतील. तसेच पुणे येथेही आणखी एक खंडपीठ स्थापन करण्याबाबत सकारात्मक विचार करावा, अशी विनंती उच्च न्यायालयास करण्यास मंत्रिमंडळाने मान्यता दिली अाहे. खंडपीठाच्या मागणीसाठी गेली ३० वर्षे लढा सुरू असून कोल्हापूरच्या वकिलांनी ही मागणी लावून धरली होती. प्रसंगी आंदोलनेही केली होती.
प्रस्तावित कोल्हापूर फिरते खंडपीठ
कोल्हापूर, सोलापूर, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी.

मागणी मान्य झाल्याचा आनंद
गेली तीन दशके या सहा जिल्ह्यांतील दीड कोटी जनता कोल्हापूर येथे खंडपीठ व्हावे या मागणीसाठी संघर्ष करत होती. त्यासाठी समाजाच्या सहकार्याने अनेक आंदोलने उभारली. त्याची दखल घेत शासनाने ही शिफारस केल्याने दीड कोटी जनतेची मागणी मान्य झाल्याचा आनंद होत आहे.
-अॅड.विवेक घाटगे, अध्यक्ष, कोल्हापूर खंडपीठ कृती समिती

काय अाहे सर्किट बेंच?
कोल्हापूरला पूर्णवेळ खंडपीठ मिळाले नसले तरी फिरते खंडपीठ मिळण्याचा मार्ग माेकळा झाला अाहे. उच्च न्यायालयाने मंजुरी दिल्यानंतर महिन्यातील ठरावीक वेळेत उच्च न्यायालयात या सहा जिल्ह्यांतील प्रलंबित असणारे खटले काेल्हापुरात सुनावणीसाठी घेतले जातील.
आठवड्यातील एक किंवा महिन्यातील एक दिवस याप्रमाणे न्यायमूर्ती कोल्हापुरात सुनावणीसाठी हजर राहतील. त्यामुळे येथील लाेकांचा मुंबईला जाण्याचा त्रास टळणार अाहे. मात्र, नेमके कोणते दिवस कामकाज चालणार हे अद्याप निश्चित झालेले नाही. काेल्हापूरसह सहा जिल्ह्यांतील सुमारे ५० हजार खटले उच्च न्यायालयात प्रलंबित अाहेत.
अाघाडीचा प्रस्ताव फेटाळला हाेता

गेल्या वर्षीमुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनीही खंडपीठासाठी शिफारस केली हाेती. मात्र हायकाेर्टाच्या समितीने हे पत्र नाकारून मंत्रिमंडळाचा ठराव अपेक्षित असल्याचे कळवले होते.

नागपूर खंडपीठ
नागपूर, वर्धा, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, यवतमाळ, अमरावती, अकोला, बुलडाणा, वाशिम.

औरंगाबाद खंडपीठ
औरंगाबाद, अहमदनगर, धुळे, जालना, जळगाव, बीड, परभणी, लातूर, उस्मानाबाद, नंदूरबार, नांदेड, हिंगोली.

मुंबई उच्च न्यायालय (प्रमुख खंडपीठ)
मुंबई, मुंबई महानगर, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, सातारा, सांगली, कोल्हापूर, पुणे, सोलापूर.