आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डॉ. दाभोलकर, पानसरे यांच्या मारेकऱ्यांना एखाद्या संघटनेचा पाठिंबा; हायकाेर्टाचे निरीक्षण

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - डॉ. नरेंद्र दाभोलकर आणि कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्या या पूर्वनियोजित स्वरूपाच्या असून त्यामागे संघटनात्मक पाठिंबा असल्याचे निरीक्षण उच्च न्यायालयाने बुधवारी नोंदवले. तसेच दाभोलकर आणि पानसरे हत्या प्रकरणातील फरार आरोपी सारंग अकोलकर आणि विनय पवार यांचा शोध एक आव्हान म्हणून करा, असे निर्देशही न्यायालयाने सीबीआय आणि विशेष तपास पथकाला दिले आहेत.   

डाॅ. दाभोलकर आणि कॉ. पानसरे हत्या प्रकरणातील सीलबंद तपास अहवाल तपास यंत्रणांनी बुधवारी न्या. सत्यरंजन धर्माधिकारी आणि न्या. विभा कंकणवाडी यांच्या खंडपीठासमोर सादर केला. या दोन्ही हत्यांमध्ये परस्पर संबंध असून यामागे एखाद्या संघटनेचा पाठिंबा आणि त्या संघटनेची आर्थिक ताकद या आरोपींच्या मागे उभी असल्याचे स्पष्ट दिसत आहे, असे मत न्यायालयाने नोंदवले. तसेच या प्रकरणातील आरोपींचे समाजातही काही लागेबांधे असतील, त्याचा शोध घ्या, असे सांगत अकोलकर आणि सारंग पवारला पकडण्यासाठी सध्याच्या कार्यपद्धतीपेक्षा वेगळ्या कार्यपद्धतीचा तुम्हाला अवलंब करावा लागेल, असे मतही न्यायालयाने या वेळी नोंदवले.     

शेजारी राज्यांत शाेध घ्या : आसपासच्या चार-पाच राज्यांतच अकाेलकर व सारंग पवार असू शकतील.  आजच्या काळात आरोपी फार काळ तपास यंत्रणांच्या कक्षेबाहेर राहू शकत नाही, असेही न्यायालयाने यंत्रणांना सुचवले. यावर विचार करून प्रयत्न करा आणि त्याबाबतचा प्रगती अहवाल पुढील सुनावणीच्या वेळी सादर करा, असे सांगत पुढील सुनावणी १३ सप्टेंबरला ठेवली आहे.
बातम्या आणखी आहेत...