आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मालवणी विषारी दारूकांडचा खरा सूत्रधार काेण : हायकाेर्ट

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - मालवणी विषारी दारूकांडप्रकरणी मुंबई पोलिसांच्या तपासावर न्यायालयाने नाराजी व्यक्त केली आहे. पाच दिवस उलटल्यानंतरही तपासात विशेष प्रगती नसल्याबद्दल नाराजी व्यक्त करत या प्रकरणाचा खरा सूत्रधार कोण असा सवाल न्यायालयाने मुंबई पोलिसांना विचारला आहे. तसेच या प्रकरणात अटक केलेल्या सर्व आरोपींना न्यायालयाने २६ जूनपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. दरम्यान या प्रकरणातील मृतांची संख्या आता १०१ झाली आहे.

रविवारी अटक केलेल्या अ‍ॅग्नेस ऊर्फ ग्रेसी आंटी आणि ममता यादव ऊर्फ मैनामी अक्का या दोघींना सोमवारी किल्ला न्यायालयात हजर करण्यात आले. या वेळी दोघींना न्यायालयाने २६ जूनपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. दरम्यान, पोलिसांच्या तपासावर न्यायालयाने चांगलीच कानउघाडणी केली.

पोलिसांनी स्थानिक स्तरावर वेळेवरच कारवाई केली असती तर ही दुर्दैवी घटना घडली नसती असे सांगत या प्रकरणातील मुख्य सूत्रधार कोण आहे, अशी विचारणाही न्यायालयाने गुन्हे शाखेकडे केली. अटक केलेल्या आरोपींपैकी या प्रकरणात नेमकी कोणाची काय भूमिका आहे, ही विषारी दारू कोणी तयार केली, हे रॅकेट नेमके किती मोठे आहे, अशी प्रश्नांची सरबत्ती करत न्यायालयाने गुन्हे शाखेच्या तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

मुंबईच्या मालवणी परिसरात १७ जून रोजी विषारी दारू प्यायल्याने आतापर्यंत १०१ लोकांचा मृत्यू झाला असून चाळीसपेक्षा अधिक बाधितांवर अजूनही आसपासच्या भागातील रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत. विषारी दारूकांडप्रकरणी मुंबई पोलिसांनी राजू लंगडा, डोनाल्ड पटेल, गौतम आरडे, सलीम शेख आणि फर्नांडिस डिमेलो यांना अगोदरच अटक केली असून त्यांनाही २६ जूनपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.

मुख्यमंत्रीच जबाबदार
"विषारी दारूमुळे शंभर गरिबांची कुटुंबं उद्ध्वस्त झाली. पोलिस खात्याच्या अकार्यक्षमतेमुळेच गावठी दारूच्या बेकायदा हातभट्ट्या फाेफावतात. त्यामुळे हे गृहखात्याचेच अपयश आहे. हे विभाग सांभाळणारे मंत्री दोषी आहेत. आमच्या काळात ऊठसूट राजीनाम्याची मागणी करणारे शंभरपेक्षा अधिक लोकांचे बळी गेल्यानंतरही काही बोलत नाहीत. पावसाळी अधिवेशनात आम्ही यावर आवाज उठवू.’ - अजित पवार, विधिमंडळ नेते, राष्ट्रवादी काँग्रेस.

मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा
मुख्यमंत्र्यांना योग करण्यासाठी वेळ आहे. परंतु, शंभर बळी गेल्यानंतरही तिथे भेट देण्यास सवड असू नये, हे महाराष्ट्राचे दुर्दैव आहे. या घटनेसाठी अनेक विभाग जबाबदार आहेत. त्यांची चौकशी करून दोषींची जबाबदारी निश्चित झाली पाहिजे. मात्र, नैतिक जबाबदारी स्वीकारून मुख्यमंत्री फडणवीस व उत्पादन शुल्क मंत्री खडसे यांनी राजीनामा द्यावा. बेजबाबदार सरकारवरही ३०२ कलमान्वये गुन्हा दाखल करावा. - राधाकृष्ण विखे पाटील, विराेधी पक्षनेते

उत्तर मुंबई बनवणार दारूमुक्त
विषारी दारूने मृत्यूचा आकडा शंभरी पार गेल्यानंतर खडबडून जागे झालेल्या स्थानिक पोलिसांनी आता उत्तर मुंबई गावठी दारूमुक्त करण्याच्या दिशेने पावले उचलली आहेत. ‘माझ्या परिक्षेत्रातील सर्व पोलिस ठाण्यांना आणि इतर युनिट्सना मी परिसर गावठी दारूमुक्त करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे भविष्यात अशी दुर्घटना घडणार नाही’, अशी माहिती उत्तर विभागाचे अतिरिक्त पोलिस आयुक्त फत्तेहसिंह पाटील यांनी दिली आहे. तसेच उपायुक्तांनाही आपल्या परिक्षेत्रातील गावठी दारू नष्ट करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

असा चालत होता मालवणीतला अवैध धंदा
गौतम आरडे हा राजू लंगडा व डोनाल्ड पटेलला दीव-दमणहून गावठी भट्टीतील दारू बनवण्यासाठी लागणार्‍या वस्तू आणून द्यायचा. पुढे वसई, दहिसर, मालाड आणि मालवणी भागातील एका जागी भट्टीवर दारू बनवून तस्करीसाठी फर्नांडिस, डिमेलो आणि सलीम शेख यांच्याकडे सुपूर्द करण्यात येत. हे तिघे ही दारू मालवणी, मलाड आणि आसपासच्या परिसरात विकायचे. कमी खर्चात जास्त नफा कमावण्यासाठी या आरोपींनी ही विषारी दारू बनवली. धक्कादायक म्हणजे राजू लंगडा, सलीम, फर्नांडिस डिमेलो आणि डोनाल्ड पटेल हे दारूच्या तस्करीसाठी महिलांचा वापर करायचे. टायर ट्यूब, पिशव्या आणि फुग्यातून ही दारू आसपासच्या अनेक गुत्त्यांवर पाठवली जाई. हा धंदा उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी आणि मुंबई पोलिसांना लाच देऊन राजरोसपणे सुरू होता.