आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

घरधनी तर गेला, आता मदतीसाठी वणवण

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - भिजलेल्या कपड्यानिशी आपल्या आईच्या कडेवर बसून भोकर्‍या डोळ्यांनी आसपासच्या हालचालींकडे शांतपणे पाहणारा अशोक दुर्लेकरचा अवघा तीन- साडेतीन वर्षांचा मुलगा.. अशोक हा मालवणी विषारी दारूकांडाचा पहिला बळी.. मात्र, रुग्णालयात दाखल होण्यापूर्वीच त्याने रस्त्यात जीव सोडल्याने त्याचे शवविच्छेदन होऊ शकले नाही.. आणि त्याचा अहवाल नाही म्हणून ‘मृतांच्या नातेवाइकांना मिळणार्‍या मदतीचा धनादेश तुम्हाला मिळणार नाही’ असे तांत्रिक कारण देत अशोकच्या पत्नीला प्रशासनाने मदत नाकारल्याची धक्कादायक बाब पुढे आली. आज दिवसभरात केवळ १२ जणांना मदतीचे चेक देण्यात आले. मालवणीतील भीषण दारूकांड उलटून पाच दिवस झाल्यानंतर या वस्तीतील भीषण वास्तवाचा ‘दिव्य मराठी’ने घेतलेला आढावा..

अशोक दुर्लेकर मुळचा गुलबर्ग्याचा.. दहा-बारा वर्षांपूर्वी तो मुंबईला मावशीकडे कामाच्या शोधात आला. मग शेजारच्या अनेक तरुणांसारखा तोही गवंड्याच्या हाताखाली मजुरीचे काम करू लागला. १७ जूनच्या रात्री नेहमीप्रमाणे दारूच्या गुत्त्यातून घरी येऊन झोपलेल्या अशोकला अस्वस्थ वाटू लागले. सकाळी त्याची प्रकृती गंभीर झाली. घाबरलेल्या पत्नीने नातेवाइकांना बोलावले. त्याला रुग्णालयात नेण्याचे प्रयत्न झाले, मात्र घरापासून काही अंतरावरच अशोकने प्राण सोडला. दारूने मृत्यू झाल्याने चाैकशीचा ससेमिरा मागे लागेल या भीतीपोटी त्याच्या कुटुंबीयांनी पोलिसांना न कळवता त्याच्यावर अंत्यसंस्कार केले. स्मशानातून ही सगळी मंडळी घरी येत नाहीत तोवर याच भागातील लक्ष्मीनगर झोपडपट्टीत एकच हलकल्लोळ माजला होता. अशोकप्रमाणेच दारू प्यायलेल्या इतरांचाही विषारी दारूने जीव घेतला होता.

पाेलिसांकडून आता दारूविराेधी जनजागृती
आजही या वस्तीवर भीषण दारूकांडाचे सावट आहे. पण हातावर पोट असलेल्या या लोकांना शोक करायलाही वेळ नाही. सरकारी मदत मिळवण्यासाठीचा संघर्ष सुरू झालाय. वस्तीत शिरताच व्हॅनमधून गडबडीने उतरून वस्तीतल्या रस्त्याने धावत जाणारे पोलिस दिसले. त्यांच्या मागे गेल्यावर कळले की या दारूकांडातील आराेपी डोनाल्ड पटेलच्या घरासमोर बळी गेलेल्यांच्या काही नातेवाइकांनी हंगामा केला होता. पोलिस येताच पांगापांग झाली. मात्र, वस्तीत ठिकठिकाणी घोळक्याघोळक्याने चर्चा करणारे तरुण दिसत होते. कुठे तरी मुंबई पोलिसांनी जनजागृतीसाठी लावलेली दारूबंदीची पोस्टर्स दिसत होती.

१९९२ च्या दंगलीतही इतकी हानी झाली नाही
गर्दीतून बाजूला निर्विकारपणे तरुण उभा होता. नाव कमलेश. त्याचेही जिवलग मित्र मृत्युमुखी पडले होते. ‘साहेब.. १९९२ च्या दंगलीत पण एवढे लोक मेले नव्हते आमच्या वाडीत.. एकेका घरात तीन-तीन लोक मेलेत,' त्याची ही प्रतिक्रिया ताे हताशपणे देत हाेता. या भागात राहणारे लोक बहुतांशी गुलबर्गा, सोलापूर, नगर जिल्ह्यातले. काेणी मजुरी करते, तर काेणी रंगकाम करतात, कुणी लाइट फिटिंगची कामे करतात, अशी माहिती कमलेशने दिली. दिवसभर अंगमेहनत केल्यानंतर दीड-दोनशे रुपयांची कमाई हाती पडल्यानंतर १०- २० रुपयांची दारू पिणे हा इथल्या अनेकांचा दिनक्रम होता.

दाेन पाेरं तर गेली, आता लग्नाच्या पाेरींचे काय?
मोठ्या गुत्तेवाल्यांकडून गावठी दारू आणून राजू लंगडा आणि इतर लोक विक्री करत असत. ‘ते काय लंगड्याचे घर', असे म्हणत कमलेशने एका घराकडे बोट दाखवले. आता या घराला पोलिसांनी सील ठोकले आहे. त्या घराजवळ शांता साबळे नावाची वृद्ध महिला भेटली. ‘दोन पोरं व्हती..एक चाळिशीचा नि एक चाळीसला दोन कमी.. दोघंबी एकाच फटक्यात गेली. आता त्यांच्या लग्नाच्या दाेन पोरींचं वजं कसं उतरायचं..' असं भडाभडा ती बोलून गेली. राजू साबळे आणि अर्जुन साबळे हे रंगकाम करणारे मुलगे तिने गमावले हाेते. अशाच शेकडो व्यथा इथल्या वस्तीत प्रत्येकाच्या घरात, चेहर्‍यावर दिसून येत आहेत.

लेकरांचं कसं व्हणार
‘या दारूकांडात बळी गेलेल्यांना मुख्यमंत्री निधीतून एक लाखाची मदत जाहीर झाली आहे. मात्र, अशोकचा शवविच्छेदन अहवाल आणि पोलिस रेकाॅर्डमध्ये नोंद नसल्याने त्याच्या पत्नीला मदत मिळणार नाही...’ पाणावलेल्या डोळ्यांनी अशोकची मावशी शिवगंगा सांगत होती. ‘या लेकरांचं आता कसं व्हनार' असं म्हणत पदराने डोळे पुसत होती.
बातम्या आणखी आहेत...