आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हॉर्निमन-फाउंटनदरम्यान वॉक वे ; राज्यसरकारच्या पुढाकारातून साकारला अनोखा प्रयोग

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - रस्त्यात चालताना गाड्यांचा अडथळा नाही की आवाज नाही. . . एखादा कलाकार छान गिटारवर गाणं वाजवून तुमचे मनोरंजन करतो आहे . . हॉर्निमन सर्कलमध्ये आकर्षक स्टॉल्सवर काहींनी गर्दी केली आहे. दक्षिण मुंबईच्या गजबजलेल्या भागामध्ये हे दृश्य म्हणजे केवळ स्वप्नच वाटेल, पण राज्य सरकारच्या पुढाकाराने पर्यटक आणि स्थानिकांसाठी हॉर्निमन सर्कल ते फ्लोरा फाउंटनदरम्यान असा खास वॉक वे बनवण्यात येणार आहे. मुंबईचे पालकमंत्री जयंत पाटील यांनी याबाबत शनिवारी अधिकृत घोषणा केली. पर्यटक, स्थानिक लोकांना आठवड्यातून किंवा महिन्यातून एक दिवस वॉक वे चा लाभ घेता येणार आहे. मुंबईमध्ये पर्यटन स्थळे अनेक आहेत. त्याचबरोबर शहराला स्वत:चा इतिहास, संस्कृतीही आहे. त्याची लोकांना ओळख करून देताना मनोरंजनही व्हावे ही यामागची संकल्पना असल्याचे पाटील यांनी सांगितले.
परदेशामध्ये अनेक ठिकाणी सांस्कृतिक वारसा जपण्यासाठी अशा पद्धतीने वॉक वे केले जातात. त्याच धर्तीवर येथेही या प्रयोग करण्यात येणार आहे. संबंधित भागाचा आराखडा बनवण्याच्या सूचना वास्तू विशारदांना करण्यात आल्याचे पाटील यांनी सांगितले. तसेच विविध हस्तकलेच्या वस्तू, मुंबईची स्वत:ची उत्पादने, करमणुकीचे कार्यक्रम, फोटोग्राफी असे अनेक प्रयोग करण्यात येतील. तसेच या भागातील फुटपाथ प्रामुख्याने लोकांना चालण्यासाठी दुरुस्त करण्यात येईल.


आवडते कलाकार करमणूक करणार
मुंबईचे बहुतेक रस्ते माणसांनी, वाहनांनी, दुकाने आणि फेरिवाल्यांनी गजबजलेले असतात. अशा रस्त्यांवरून चालणे नकोसे होते. त्यासाठीच हॉर्निमन सर्कल आणि फ्लोरा फाउंटनच्या हेरिटेज परिसरामध्ये फक्त चालण्यासाठी हा वॉक वे असेल. येथे कोणत्याही प्रकारच्या गाड्यांना मनाई करण्यात येईल. लोकांना आवडणारे कलाकार येथे करमणुकीसाठी असतील.