आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुरक्षेसाठी मुंबईत १२५० कॅमेरे, अाज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई; मुंबईवर झालेल्या अतिरेकी हल्ल्यानंतर शहराची सुरक्षितता अधिक भक्कम करण्यासोबतच कायदा आणि सुव्यवस्था राखणे किंवा वाहतुकीचे नियंत्रण करणे तसेच एखादी घटना घडल्यानंतर तपास यंत्रणेच्या मदतीसाठी मुंबईत सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याची योजना आखून कामाला सुरुवात करण्यात आली. या योजनेच्या पहिल्या टप्प्यांतर्गत दक्षिण मुंबईतील १२५० ठिकाणी सीसीटीव्ही लावण्यात आले असून त्याचे लोकार्पण सोमवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते हाेणार आहे.
२६ नाेव्हेंबर २००८ राेजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर मुंबईची सुरक्षा अधिक भक्कम करण्यासाठी संपूर्ण शहरात अत्याधुनिक तंत्रज्ञानाने युक्त असे जवळपास सहा हजार सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचा निर्णय तत्कालीन सरकारने घेतला होता.

या प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात दक्षिण मुंबईतील कुलाबा ते वरळी या परिसरादरम्यानच्या संवेदनशील आणि महत्त्वाच्या ठिकाणी सुमारे १२५० सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत. या कॅमेऱ्यांचे नियंत्रण आणि सततचे निरीक्षण तीन नियंत्रण कक्षांद्वारे होणार आहे. या कॅमेऱ्यांमध्ये वाहनांचे नंबर प्लेट डिटेक्शन, व्हिडिओ ॲनॅलिसिस तसेच तब्बल एक हजार पोलिस वाहनांच्या जीपीएस ट्रॅकिंगची सुविधा असणार आहे. या पहिल्या टप्प्यातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा लोकार्पण सोहळा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते साेमवारी हॉटेल ताजमहाल येथे पार पडणार आहे.

पुढील वर्षीपर्यंत प्रकल्प पूर्ण हाेणार : बक्षी
पहिल्याटप्प्याच्या लोकार्पणानंतर या प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्याचे काम एप्रिल २०१६ मध्ये, तर तिसऱ्या आणि अंतिम टप्प्याचे काम ऑक्टोबर २०१६ पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित आहे. लार्सन अँड टुब्रो या कंपनीमार्फत हे काम करण्यात येत असून या प्रकल्पाचे तांत्रिक सल्लागार मेसर्स प्राइस वॉटर हाऊस कुपर्स हे आहेत. या प्रकल्पामुळे मुंबई शहराच्या सुरक्षेबरोबरच दहशतवादी कारवायांवर देखरेख ठेवणे, वाहतुकीचे नियंत्रण करणे आणि वाहतुकीला शिस्त लावण्यास मदत होणार असल्याची माहिती गृह विभागाचे अपर मुख्य सचिव के. पी. बक्षी यांनी दिली.