आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंबईला झाली क्षयरोगाची बाधा

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- मुंबईत क्षयरुणांच्या संख्येत (टीबी) झपाट्याने वाढ होत असून या रोगाने महापालिकेसमोर मोठे आव्हान उभे केले आहे. झपाट्याने पसरणार्‍या क्षयरोगाला आटोक्यात आणण्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेच्या सहकार्याने मुंबई महापालिकेने नुकताच कृती आराखडा तयार केला आहे.

मुंबई महापालिकेने मोठय़ा प्रयत्नांनंतर मलेरिया आटोक्यात आणला आहे. मात्र शहरात आता क्षयाने डोके वर काढले असून औषधांना न जुमानणार्‍या क्षयाचे (एमडीआर टीबी ) रुग्ण झपाट्याने वाढत असल्याचे निदर्शनास आले आहे. 2011 मध्ये मुंबईत औषधांना प्रतिसाद देणार्‍या टीबीचे 29 हजार तर औषधांना प्रतिसाद न देणार्‍या टीबीचे 155 रुग्ण होते.

2012 मध्ये औषधांना प्रतिसाद देणार्‍या टीबीच्या रुग्णांमध्ये एक हजारांनी वाढ झाली. तर औषधांना प्रतिसाद न देणार्‍या टीबीच्या रुग्णसंख्येत तब्बल 2 हजारांची वाढ नोंदवण्यात आली आहे. मुंबई शहरातील 60 टक्के लोकसंख्या झोपडपट्टीत राहत असून औषधोपचार बंद केल्यामुळे एमडीआर टीबीचा प्रसार झपाट्याने होत असल्याचे पालिका प्रशासनाचे म्हणणे आहे.

भिवंडीत तीन मृतदेह सापडले- ठाण्यातील भिवंडी येथे गुरुवारी रात्री तीन अनोळखी मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली. या प्रकरणी अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली असून मृतांची ओळख पटवण्याचे काम सुरू असल्याचे पोलिस निरीक्षक बी. टी. महाजन यांनी सांगितले.
गुरुवारी सकाळी काही नागरिक परिसरात फेरफटका मारण्यासाठी निघाले असता त्यांना एका नाल्यात तीन जण मृतावस्थेत पडल्याचे दिसून आले. यानंतर काही जागरूक नागरिकांनी तातडीने घटनेची माहिती पोलिसांना दिली. तिन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत.

महाराष्ट्र बँकेकडून दुष्काळग्रस्तांना अडीच कोटी- राज्यात यंदा भीषण दुष्काळ पडल्याने मदतीसाठी राज्यातील अनेक संस्था, संघटना पुढे येत आहेत. बँक ऑफ महाराष्ट्रकडून 2 कोटी 51 लाख रुपये तर बॉम्बे हॉस्पिटलतर्फे 21 लाख रुपये आणि नाशिकच्या र्शी काळाराम संस्थानाने 5 लाख रुपयांचा धनादेश मुख्यमंत्री सहाय्यता दुष्काळ निधीसाठी मुख्यमंत्री पृ़थ्वीराज चव्हाण यांच्याकडे सुपूर्द केला. लातूर जिल्ह्यातील अहमदपूर येथील हरिवंशराय बच्चन शाळेच्या विद्यार्थ्यांनी आपल्या पॉकेटमनीतून साठवलेले 51 हजार रुपये मुख्यमंत्री निधीत जमा केले.

कैद्यांच्या मृत्यूबाबत उपायांची माहिती द्या : हायकोर्ट- कैद्यांचा कोठडीतील मृत्यू रोखण्यासाठी योजलेल्या उपायांची माहिती तीन आठवड्यांत सादर करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने गृह विभागाला दिले. सामाजिक कार्यकर्ते एन. आर. सोनी यांनी ही याचिका दाखल केली आहे. अशा प्रकारे कोठडीतील मृत्यू रोखण्यासाठी सरकारने काय उपाययोजना केल्या आहेत, याची माहिती प्रतिज्ञापत्राद्वारे द्यावी, असे निर्देश न्यायालयाने दिले. ठाणे कारागृहात झालेल्या तीन आरोपींच्या मृत्यूच्या पार्श्वभूमीवर ही याचिका दाखल केली आहे.