आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अहमदाबादचे नाव बाद, मुंबईतच होणार आंतरराष्ट्रीय आर्थिक केंद्र

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - आंतरराष्ट्रीय आर्थिक केंद्र कोणते, मुंबई की अहमदाबाद? आता हा प्रश्न मार्गी लागला आहे. मुंबईची भौगोलिक परिस्थिती लक्षात घेता तेच आंतरराष्ट्रीय आर्थिक केंद्र करण्याचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतला आहे.

देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईला आंतरराष्ट्रीय आर्थिक केंद्र बनवण्याची योजना २००७ मध्ये यूपीए सरकारने आखली. यासाठी उच्चस्तरीय समितीची स्थापनाही झाली होती.

समितीने तत्कालीन अर्थमंत्री पी. चिदंबरम यांना अहवाल सादर करून मुंबई यासाठी कशी योग्य आहे, हे पटवून दिले होते. शिवाय सन २०२० पर्यंत मुंबईचा या पार्श्वभूमीवर कशा प्रकारे विकास करता येईल उल्लेख अहवालात होता. यासंबंधीची माहिती भाजपा खासदार किरीट सोमैया यांनी "दिव्य मराठी'शी बोलताना दिली. केंद्रात मोदी सरकार आल्यानंतर मुंबईऐवजी अहमदाबादला यासाठी प्राधान्य दिले जाणार असल्याची चर्चा झडली. यावर मुंबईकर आणि शिवसेनेसह सर्व राजकीय पक्षाच्या नेत्यांच्या प्रतिक्रिया उमटल्या. मात्र हा गोंधळ सुरू असतानाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मात्र मुंबईच आंतरराष्ट्रीय वित्तीय केंद्र होईल, असा विश्वास "दिव्य मराठी'शी बोलताना व्यक्त केला होता. या पार्श्वभूमीवर मुंबईत फायनान्शियल सेझ उभारण्यात येणार असून वित्तीय संस्था येथे एकत्रितपणे काम करतील. हे सेझ कुठे असेल आणि रचना कशी असेल यावर लवकरच निर्णय घेतला जाणार आहे.

जगभरात लंडन, न्यूयॉर्क आणि सिंगापूर हे तीनच आंतरराष्ट्रीय वित्तीय केंद्र आहेत. मोठ्या उद्योगांचे करार-मदार करायचे असतील तर ते या तीन ठिकाणांपैकीच एखाद्या ठिकाणाहून होत असत. टाटा स्टील आणि कोरसमध्ये झालेला करार लंडन आणि सिंगापूरमध्येच तयार करण्यात आला होता. आर्थिक क्षेत्राचा व्यवसाय वाढत असून २०२५ पर्यंत १२० बिलियन अमेरिकन डॉलरपर्यंत पोहोचणार आहे. भारताचा यात मोठा वाटा असावा म्हणून मुंबईची निवड करण्यात आली आहे.

ती चर्चाच व्यर्थ होती...
अहमदाबाद आंतरराष्ट्रीय आर्थिक केंद्र व्हावे असा विचार पंतप्रधानांनीही कधी केला नव्हता. काही दिवसांपूर्वीच पंतप्रधानांनी मुंबईला आंतरराष्ट्रीय आर्थिक केंद्र बनवण्यास मान्यता दिली असून त्यादृष्टीने आता प्रयत्न सुरु केले जाणार आहेत. किरीट सोमैया, भाजपा खासदार

मुंबईच का?
- मुंबईमध्ये सर्व प्रमुख राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय बँका, शेअर बाजार, कमोडिटी बाजाराबरोबरच आयटीचे कुशल मनुष्यबळ उपलब्ध आहे. हेज फंड, अ‍ॅसेट मॅनेजमेंट आणि बिल डिस्काउंटिंग हाऊसेस मुंबईत आहेत.
- आर्थिक क्षेत्रातील वर्तमानपत्रे, साप्ताहिके मुंबईतून प्रकाशित केली जातात. महत्त्वाचे म्हणजे इंग्लिश भाषेचा वापर करणारे मुंबईत खूप आहेत.
- आर्थिक क्षेत्रातील तज्ज्ञ व विचारवंत मुंबईत खूप आहेत. मुंबईचा टाइम झोन जगभरातील कंपन्यांसाठी योग्य आहे. त्यामुळे २४ तास येथे काम होऊ शकते.
- मुंबईत मोबाइलधारकांची संख्या मोठ्या प्रमाणावर असून छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाबरोबरच आता नवी मुंबई येथे विमानतळ होत असल्याने जगभरातून मुंबईत येणे सहज शक्य आहे.
- रेल्वे आणि मेट्रोची सोय असून आर्थिक क्षेत्रासाठी आवश्यक असलेल्या पायाभूत सुविधा पुरवण्यावर राज्य सरकार मोठ्या प्रमाणावर लक्ष देणार आहे. वित्तीय संस्थांकरिता अनेक सवलतीही राज्य सरकार देऊ करणार आहे. त्यामुळेच मुंबईस आंतरराष्ट्रीय केंद्र बनवले जाणार आहे.
बातम्या आणखी आहेत...