मुंबई- भाविकही आता किती हुशार झाले आहेत याचा अनुभव लालबागचा राजा मंडळाला आला आहे. केंद्र सरकारने ५०० आणि एक हजारच्या नोटा रद्द केल्यानंतरही काही महाभागांनी बँकेत हिशेब द्यावा लागेल म्हणून न बदललेल्या नोटा अखेर राजाच्या चरणी टाकत आपल्या अनोख्या भक्तीची प्रचिती दिली. बाद झालेल्या एक लाख १० हजार रुपयांच्या नोटा दानपेटीत सापडल्याने मंडळाचे कार्यकर्तेही अवाक् झाले आहेत. विशेष म्हणजे सर्व नोटा हजार रुपयांच्या आहेत.
केंद्र सरकारने नोटाबंदी केल्यानंतर अनेक मंदिरांमध्ये ५०० आणि एक हजारच्या नोटा दानपेटीत टाकू नये, अशा सूचना दानपेटीवर लावलेल्या होत्या. त्यामुळे अनेकांना आपल्या घरी असलेला काळा पैसा घराबाहेर काढण्याची संधी उपलब्ध झाली नव्हती. सरकार नोटा बदलण्यास मुदत देईल, अशी आशा अनेकांना होती. त्यामुळे अनेकांनी घरात जुन्या ५०० आणि एक हजारच्या नोटा ठेवल्या होत्या. काही जणांनी तर या नोटा कचऱ्याच्या डब्यातही टाकल्या होत्या. आता नोटा बदलून मिळणार नसल्याने मोठ्या उदार मनाने या भाविकांनी लालबागच्या राजाच्या दानपेटीत जुन्या नोटा टाकून पुण्य कमवण्याचा मार्ग चोखाळला आहे.
नोटाबंदीचा परिणाम
या वर्षी २९ ऑगस्टला झालेल्या तुफान पावसामुळे भाविकांनी घरीच राहणे पसंत केले होेते. त्यामुळे यंदा रोख रक्कम कमी जमा झाल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच नोटाबंदीचाही परिणाम झाल्याचा अंदाज आहे.
पाच कोटींच्या वर दान
दरवर्षीप्रमाणे यंदाही लालबागच्या राजाला सोन्या-चांदीच्या वस्तूंचे दान झाले. सोबतच रोख रक्कमही दानपेटीत पडली आहे. दानपेटीत यंदा पाच कोटी ८० लाखांचे दान आले आहे. मात्र, ही रक्कम गेल्या वर्षीपेक्षा कमी आहे. गेल्या वर्षी लालबागच्या राजाच्या चरणी भाविकांनी सोन्या-चांदीसह तब्बल आठ कोटी रुपयांचे दान दिले होते.