आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हाहाकार: विषारी दारूने घेतले नव्वद जणांचे बळी, चार अधिकारी निलंबित

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- मुंबईतील मालवणी येथील विषारी दारू दुर्घटनेतील मृतांचा आकडा शनिवारी रात्रीपर्यंत ९० वर गेला असून ही संख्या शंभरवर जाण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. सध्या विविध रुग्णालयांत ३४ जणांवर उपचार सुरू असून यापैकी २० पेक्षा जास्त जण अत्यवस्थ आहेत. या प्रकरणात ५ आरोपींना अटक करण्यात आली आहे, तर वरिष्ठ पोलिस निरीक्षकासह ८ पोलिसांवरही निलंबनाची कारवाई करण्यात आली होती. दरम्यान, शनिवारी उत्पादन शुल्क विभागाच्या ४ अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात अाले.

उत्पादन शुल्क विभागाचे पोलिस िनरीक्षक जगदीश देशमुखसह पोलिस उपनिरीक्षक राजेंद्र साळंुखे, पोलिस शिपाई वर्षा वेंगुर्लेकर, धनाजी दळवी यांना निलंलित करण्यात आले आहे. मुख्यमंत्र्यांनी या भीषण घटनेच्या चौकशीचे आदेश िदल्यानंतर गावठी दारूचे गुत्ते शोधण्यासाठी पोलिस तसेच गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी मालवणीतील झोपडपट्ट्या पिंजून काढण्यास सुरुवात केली आहे. अनेकांना चौकशीसाठी ताब्यात घेतल्याचीही माहिती पोलिसांनी दिली.

मालाडच्या मालवणी परिसरात बुधवारी रात्री ही घटना घडली होती. याच भागातील राठोडी गावच्या काही मजुरांनी रात्री देशी दारू प्यायली होती. त्यानंतर गुरुवारी पहाटेपासून त्यांची प्रकृती खालावली. त्यांना उलट्या-जुलाबाचा त्रास होऊ लागल्याने तातडीने मालाडच्या सुराणा हॉस्पिटल आणि कांदिवलीच्या शताब्दी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. त्यांना विषबाधा झाल्याचे निदान डॉक्टरांनी केले. मृत्युमुखी पडणाऱ्यांचा आकडा हळूहळू वाढतच चालला आहे.

देशीत विषारी दारूची मोठ्या प्रमाणात भेसळ
कामगार तसेच मजुरांची मोठ्या प्रमाणावर संख्या असल्याने मालवणीत देशी दारूची दुकाने मोठ्या संख्येने आहेत. तसेच चोरट्या मार्गानेही देशी दारू विकली जाते. ज्या राजू लंगडा या विक्रेत्याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे तो जीएम या देशी दारूमध्ये भेसळ करण्याचे काम करायचा, अशी माहिती समोर येत आहे. भेसळीसाठी वापरली जाणारी गावठी दारू ही कडक असल्याने राजूकडे ग्राहक मोठ्या संख्येने जात असत. गावठीत मिथेनाॅल या रासायनिक पदार्थाचा वापर केल्याचे दिसून येत आहे. मिथेनाॅलचे प्रमाण अधिक झाल्याने एवढ्या मोठ्या संख्येने मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे.

विकणारे पकडले, पण दारू आली कुठून?
विषारी दारू आली कुठून, याचा शोध गुन्हे शाखेचे अधिकारी घेत आहेत. यासाठी ते मालवणी भागात कसून चौकशी करत आहेत. मुख्यमंत्र्यांना या प्रकरणाचा अहवाल द्यायचा असल्याने भरपावसातही क्राइम ब्रँचची चौकशी वेगात सुरू होती. २००४ मध्ये विक्रोळी विषारी दारू हत्याकांड झाल्यानंतर मुंबईतून गावठी दारू हद्दपार करण्यात आली होती. हातभट्ट्या कायमच्या बंद करण्यात आल्या. विक्रोळी, धारावी येथील अड्डे उद्ध्वस्त करण्यात आले. मात्र, मालवणीत आलेली दारू ही बोरिवलीच्या नॅशनल पार्क आदिवासी पाडे किंवा पालघर जिल्ह्यामधूनही आल्याचा संशय आहे. त्या दृष्टीनेही तपास सुरू आहे.