आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामुंबई - मुंबईत एक वर्ष महापौर पद आणि दोन वर्षे स्थायी समितीचे अध्यक्षपद भाजपला मिळावे, ही मागणी प्रदेशाध्यक्ष सुधीर मुनगंटीवार यांनी मंगळवारी शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्या समोर ठेवली. भाजपची मते 18 टक्क्यांनी वाढली असून ताकदही वाढल्याने महापौरपदासाठी पक्षातर्फे दावा केला जात आहे.
भाजप नेत्यांनी मंगळवारी ‘मातोश्री’वर जाऊन शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा केली. या वेळी भाजपचे विधानसभा विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे, विधान परिषद विरोधी पक्षनेते विनोद तावडे, प्रदेशाध्यक्ष सुधीर मुनगंटीवार उपस्थित होते. आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुका लक्षात घेऊन पहिली अडीच वर्षे शिवसेनेचा महापौर आणि स्थायी समिती अध्यक्ष असावा. त्यानंतर एक वर्ष भाजपकडे सत्ता द्यावी व पुन्हा उरलेल्या कालावधीसाठी शिवसेनेने आपला महापौर निवडावा असा प्रस्ताव या वेळी भाजपच्या नेत्यांकडून मांडण्यात आल्याचे पक्षातील सूत्रांनी सांगितले. त्यावर उद्धव ठाकरे यांनी कोणतेही आश्वासन किंवा प्रतिक्रिया या दिली नाही. ‘पुढील चर्चेदरम्यान पाहू’, असे ते म्हणाल्याचे समजते.
भाजपच्या नगरसेवकांच्या सोमवारी झालेल्या सत्काराच्या कार्यक्रमामध्ये विनोद तावडे यांनी महापौर पद आणि स्थायी समिती अध्यक्षपद मिळावे अशी मागणी केली होती. मुंबई महापालिकेच्या यंदाच्या निवडणुकीत भाजपच्या लढलेल्या एकूण जागांपैकी 50 टक्के जागा निवडून आल्या आहेत. शिवसेनेची एकूण नगरसेवक संख्या जास्त असली तरी गेल्या वर्षीच्या तुलनेत त्यांच्या जागा कमी झाल्या आहेत. त्यामुळे शिवसेनेवर दबाव निर्माण करून पक्षाच्या कार्यकर्त्यांना महत्त्वाच्या पदांवर पोहोचविण्यासाठी ही रणनिती असल्याचे सूत्रांचे
म्हणणे आहे.
औरंगाबादेत युतीचीच सत्ता
नाशिकमध्ये महापौरपदाचा तिढा अजून सुटलेला नसला तरी महायुतीचाच महापौर बसेल, असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले. भाजप नेते व शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्यामध्ये बैठक झाल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. नाशिकमध्ये महायुतीचा महापौर होईल या दृष्टीने एकत्रितपणे उद्धवजींबरोबर चर्चा केली. प्रत्येक जिल्हा आणि महापालिकांचा आढावाही घेतला. नाशिकमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस किंवा मनसेचा पाठिंबा घेणार नसल्याचेही त्यांनी या वेळी स्पष्ट केले. शिवसेना, भाजप, रिपाइंची महायुती 10 जिल्हा परिषदांमध्ये सत्ता स्थापन करेल, असा दावा विनोद तावडे यांनी केला. नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, वर्धा, रत्नागिरी, रायगड, जळगाव, औरंगाबाद आणि हिंगोली येथे युतीची सत्ता येईल, असे ते म्हणाले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.