आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Mumbai Metro Election 2014 Latest News In Marathi

कामतांच्या विजयासाठी मेट्रोचा आधार घेण्याची धडपड, मुख्यमंत्रीच करताहेत धावपळ

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - मुंबईत काँग्रेस आघाडीला जबर दणका मिळण्याचे संकेत असल्याने ही निवडणूक जिंकण्यासाठी आता मेट्रोची मदत घेण्याचे डावपेच मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आखल्याचे संकेत आहेत. मुंबईत 24 एप्रिल रोजी मतदान होणार असून त्यापूर्वी वर्सोवा-अंधेरी-घाटकोपर ही मेट्रो सुरू झाली तर काँग्रेस उमेदवार गुरुदास कामत यांना त्याचा फायदा होऊ शकतो. काँग्रेसचा अंदाज आहे.
काँग्रेसचे लोकसभेचे उमेदवार गुरुदास कामत हे उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातून लढत असून प्रस्तावित मेट्रो याच मतदारसंघातून धावणार आहे. कामतांना समाजवादी पक्षाचे उमेदवार कमाल खान, शिवसेनेचे गजानन कीर्तीकर आणि मनसेचे महेश मांजरेकर यांचे कडवे आव्हान असल्याने कामत यांच्या विजयाबद्दल काँग्रेस साशंक आहे. त्यामुळे मेट्रो सुरू झाली तर काँग्रेस आणि कामत यांच्यामुळेच ही मेट्रो सुरू झाली असे मतदारांपर्यंत संदेश देऊन त्यांची मते आपल्याकडे वळविण्याची काँग्रेसचे मनसूबे आहेत. या मेट्रोचा संदेश अऩ्य मतदारसंघातही जाऊ शकतो आणि काँग्रेस आघाडीला त्याचा फायदा होऊ शकतो.
मुंबईकरांसाठी मोनो रेलची भेट दिल्यानंतर आता आघाडी सरकार मेट्रोची भेट देण्याच्या तयारीत आहे. 24 एप्रिलपूर्वी मेट्रो सुरु करण्याचा प्रयत्न एमएमआरडीए करीत असून लवकर सुरक्षा प्रमाणपत्र मिळावे यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न केले जात आहेत. विशेष म्हणजे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनीच यासाठी पुढाकार घेतल्याचे वृत्त आहे. मेट्रोच्या सुरक्षेच्या सर्व चाचण्या झाल्यानंतर रिसर्च डिझाइन्स अँड स्टँडर्ड ऑर्गनायझेन (आरडीएसओ) ने सुरक्षा प्रमाणपत्र दिले आहे. आता फक्त रेल्वे सुरक्षा आयुक्तांकडून अंतरिम सुरक्षा चाचणी बाकी आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार रेल्वे सुरक्षा आयुक्तांनी लवकरात लवकर सुरक्षा प्रमाणपत्र द्यावे यासाठी मुख्यमंत्री स्वत: प्रयत्न करीत आहेत.
मेट्रो सुरू होण्यास आचारसंहितेचा अडसर नाही
मुख्यमंत्र्यांनी दिल्लीतील नेत्यांशी याबाबत बोलून लवकरात लवकर प्रमाणपत्र मेट्रोला मिळावे असा प्रयत्न करण्यास सांगितले आहे. याचा निवडणुकीत फायदा होईल असे मुख्यमंत्र्यांनी दिल्लीश्वरांना सांगितल्याचे समजते. आचारसंहिता लागू असली तरी मेट्रो रेल्वे सुरु करण्यास अडचण नाही. त्यामुळेच मुख्यमंत्री मेट्रो लवकर सुरु करण्यावर भर देत आहेत. 24 एप्रिलपूर्वी मेट्रो सुरु झाली तर त्याचा वापर प्रचारामध्ये आघाडीचे उमेदवार करू शकतील. त्याचा फायदा काँग्रेस मिळणार्‍या मतांच्या टक्केवारीत वाढ होण्यात होईल असा विश्वास काँग्रेस आणि राष्ट्रवादीतील नेत्यांना वाटत आहे. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत मुंबईतील मतदानापूर्वी मेट्रो सुरु करण्याचा प्रयत्न केला जात आहे.
महिनाअखेरीस मेट्रो शक्य
एमएमआरडीएचे जनसंपर्क अधिकारी दिलीप कवठकर यांच्याशी सुरक्षा प्रमाणपत्राबाबत विचारणा केली असता त्यांनी सांगितले, आम्ही सगळ्या चाचण्या पूर्ण केलेल्या आहेत. आता फक्त रेल्वे सुरक्षा आयुक्तांच्या प्रमाणपत्राची वाट पाहत आहोत. 24 एप्रिलपूर्वी मेट्रो सुरू होईल का ? असे विचारता कवठकर म्हणाले, त्याबाबत मी सांगू शकत नाही. परंतु मेट्रो लवकर सुरू करण्याचा आमचा प्रयत्न आहे.