आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अखेर झाला मेट्रोचा पहिला प्रवास;वर्सोवा ते घाटकोपरपर्यंत धावणार मेट्रो

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - सकाळी साडेदहा वाजल्यापासूनच अंधेरी पश्चिम येथील चार बंगला स्थित मेट्रोच्या डेपोमध्ये प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींची गर्दी होऊ लागली होती. मेट्रो सुरू होण्यासाठी आवश्यक असलेले शेवटचे मेट्रोच्या रोलिंग स्टॉकचे प्रमाणपत्र मिळाल्याने पत्रकारांना प्रथमच अधिकृतरीत्या मेट्रोतून प्रवास करण्यासाठी रिलायन्सतर्फे आमंत्रित करण्यात आले होते. त्यामुळे पत्रकार, फोटोग्राफर यांची चांगलीच गर्दी झाली होती.

11 वाजता मेट्रोच्या कार्यालयात पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. मेट्रो वनचे सीईओ अभय मिश्रा, प्रोजेक्ट डायरेक्टर भरत मुदगिर व देबाशिष मोहंती आले. मात्र पत्रकार परिषद घेण्याऐवजी त्यांनी प्रथम मेट्रोची सफर करण्याचे ठरवले आणि सगळ्यांनी डेपोतून डी.एन. नगर स्थानकाकडे कूच केली. प्लॅटफॉर्मवर पांढर्‍या, गुलाबी, हिरव्या रंगाने सजलेली चार डब्यांची आकर्षक मेट्रो उभी होती.
मुख्यमंत्र्यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवण्याच्या वेळी मेट्रो आतून पाहण्याची संधी मिळाली होती. परंतु त्यातून खराखुरा प्रवास करता आला नसल्याने प्रवास करण्याची उत्सुकता होती. परदेशात तसेच देशातील मेट्रोमध्ये अनेक वेळा बसण्याची संधी मिळाली होती; परंतु मुंबईची पहिली मेट्रो असल्याने उत्सुकता जरा जास्तच होती.

फोटोग्राफर्सचे फ्लॅश लगेचच चमकू लागले तर इलेक्ट्रॉनिक माध्यमाच्या प्रतिनिधींनी लाइव्ह कव्हरेजचे काम सुरू केले. ट्रेनच्या दोन्ही बाजूंना बसण्यासाठी स्टीलचे बाकडे होते. यापैकी काही जागा महिला, वरिष्ठ नागरिकांसाठी आरक्षित होत्या. ट्रेनच्या आत वातानुकूलन खूपच चांगले होते. मोठय़ा खिडक्या असल्याने भरपूर उजेडही येत होता. दरवाजाच्या बाजूला छोटे स्क्रीन लावलेले होते. दरवाजाजवळ सुरक्षेच्या सूचना लावलेल्या होत्या तसेच संकटप्रसंगी मोटरमनशी बोलण्यासाठी स्पीकर व्यवस्थाही लावलेली दिसली.

मेट्रो सुरू झाली आणि मुंबईच्या स्कायलाइनचे न झालेले दश्रन होऊ लागले. डी.एन. नगरहून अंधेरी स्टेशनकडे जाताना रस्त्यात रेल्वे ट्रॅकवर बांधलेला मेट्रोचा पूल लागला. हा पूल पहाटेच्या वेळेसच काम करून पूर्ण करण्यात आला होता. अंधेरी स्टेशनवरून चकालाच्या दिशेने ट्रेन जाताना फ्लायओव्हरवर बांधलेला केबलचा पूल लागला. हा पूल खरोखरीच वास्तुकलेचा नमुना आहे. फ्लायओव्हरवरील रहदारीला अडथळा न आणता हा केबल पूल बांधण्यात आला आहे. त्यानंतर एअरपोर्टचे दश्रन घडवत मेट्रो जागृतीनगर स्टेशनवर पोहोचली.

पुन्हा ट्रेन वर्सोव्याकडे निघाली. मध्ये हायवेवर बांधण्यात आलेल्या केबल पुलावर ट्रेन काही वेळ फोटोसेशनसाठी थांबली. हायवेचे फोटोसेशन झाल्यानंतर अंधेरी स्टेशनवर ट्रेन 15 मिनिटांसाठी थांबवण्यात आली. मेट्रोच्या मार्गावरील अंधेरी हे सगळ्यात मोठे आणि भव्य स्टेशन असल्याचे मेट्रो वनच्या अधिकार्‍यांनी सांगितले. अंधेरीला काही महिला, मुले आणि कुटुंबे दिसली. त्यांच्याबाबत माहिती घेतली असता मेट्रो वनच्या कर्मचार्‍यांच्या कुटुंबीयांनाही मेट्रोतून प्रवास करण्याची संधी दिली जात असल्याचे सांगितले. तेथून पुन्हा ट्रेन वर्सोव्याकडे निघाली आणि आमचा तासाभराचा प्रवास संपला.