आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Mumbai Metro News In Marathi, Divya Marathi, Indian Railway

सुरक्षा प्रमाणपत्रामुळे मुंबई मेट्रोचा मार्ग मोकळा,आता प्रतीक्षा रेल्वे विभागाच्या परवानगीची

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - गेली काही वर्षे सुरू होण्याच्या प्रतीक्षेत असलेली मुंबईची मेट्रो लवकरच धावण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. मेट्रो रेल्वेसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण असलेले सुरक्षा प्रमाणपत्र सीएमआरएएसकडून शुक्रवारी देण्यात आले. या प्रमाणपत्रामुळे येत्या काही दिवसांतच वर्सोवा-अंधेरी-घाटकोपर हा पहिल्या टप्प्यातील 11 किलोमीटरचा मेट्रो प्रवास करण्याची संधी मुंबईकरांना मिळणार आहे.

गेल्या काही दिवसांपासून मेट्रोच्या सुरक्षा चाचण्या सुरू होत्या. खरे तर लोकसभा निवडणुकीपूर्वीच मेट्रो सुरू करण्याची धडपड केली जात होती. काही दिवसांपूर्वीच रचना आणि प्रमाण संस्थेने मेट्रोच्या कामाबाबत समाधान व्यक्त केले होते. प्रतीक्षा फक्त सुरक्षा प्रमाणपत्राची होती. गेल्या आठवड्यात सुरक्षेची आणखी एक चाचणी करण्यात आली होती. त्यानंतर 2 मे रोजी रेल्वे बोर्ड आणि मेट्रो रेल्वे सुरक्षा आयुक्त पी. एस. बघेल यांनी मेट्रोला सुरक्षा प्रमाणपत्र दिल्याची माहिती रिलायन्सच्या प्रवक्त्याने दिली. मेट्रोचा वेग ताशी 50 मैल असा आटोक्यात ठेवण्यात यावा असे या प्रमाणपत्रात म्हटल्याचे सांगितले जात आहे. आता फक्त डब्यांबाबतची प्रक्रिया सुरू असून त्यासाठी रेल्वे बोर्डाला 22 एप्रिल रोजी पत्र दिले आहे. त्यांच्याकडून परवानगी मिळाल्यानंतर सात दिवसांत मेट्रो सुरू करता येईल, असेही रिलायन्सच्या प्रवक्त्याने सांगितले.

नगरविकास राज्यमंत्री उदय सामंत यांनी मेट्रोला सुरक्षा प्रमाणपत्र मिळाल्याबाबत समाधान व्यक्त करीत सांगितले की, लवकरच आम्ही मेट्रोच्या अधिका-यांची एक बैठक घेणार असून त्यात मेट्रो लवकरात लवकर कशी सुरू करता येईल याबाबत चर्चा केली जाईल. मेट्रो सुरू झाल्यामुळे मुंबईकरांचा प्रवास सुखकर होणार असल्याचेही ते म्हणाले.