मुंबई - गेली सहा वर्षे रखडलेल्या मेट्रो रेल्वेला अखेर हिरवा कंदील मिळत असताना दरवाढीवरून राजकारण सुरू झाले आहे. मेट्रोची भाववाढ करण्यासाठी रिलायन्सला भाजप मदत करत असल्याचा घणाघाती आरोप मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला. रिलायन्सने भाडेवाढ करून रविवारी मेट्रोचे उद्घाटन करावे, यासाठी भाजपचे दबावाचे राजकारण सुरू आहे. मात्र राज्य सरकारला ही भाववाढ अजिबात मान्य नाही, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. या भाववाढीविरोधात एमएमआरडीएने न्यायालयात याचिकाही दाखल केली असून त्याविषयी सोमवारी निर्णय होणार आहे, अशी माहितीही त्यांनी दिली.
मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर बसल्यापासून पृथ्वीराज चव्हाण यांनी कोणावरही टीका करण्याचे कटाक्षाने टाळले. मात्र, विधानसभा निवडणुका जवळ आल्याने आपले अस्तित्व दाखवण्यासाठी भाजपवर आरोप करण्याचे धाडस दाखवले आहे. रिलायन्स, अदानी या उद्योगांच्या पाठीशी कुठला पक्ष आहे, हे तुम्हाला माहीत आहे. आता मेट्रो दरवाढीच्या निमित्ताने भाजप रिलायन्सला मदत करत आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले.
2006 मध्ये मेट्रोबाबत रिलायन्सशी करार झाला, तेव्हा 3 कि.मी. साठी 9 रु., 3 ते 8 कि.मी.करिता 11 रु., तर 8 कि.मी.साठी 13 रुपये तिकिटाचे दर ठरले होते. मात्र 2006 मध्ये या प्रकल्पाची किंमत 2356 कोटी होती, ती आता वाढून 4210 कोटी रुपये झाली असल्याचे कारण दाखवून रिलायन्स भाववाढ करत आहे. भाडेवाढ प्रस्तावाबाबत समिती नियुक्त करण्यात आली असून ही समिती त्यावर विचार करत आहे. मात्र असे असूनही रिलायन्सची राज्य सरकारला न जुमानता भाडेवाढीला तयारी झाली आहे. त्यांना 9,11,13 ऐवजी 10, 20, 30 व 40 असे भाडे हवे आहे, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. रिलायन्सच्या या भाडेवाढीला पाठिंबा देताना भाजपला रविवारीच उद्घाटन हवे आहे. यासाठी भाजपचे नेते उतावीळ झाले आहेत. भाडेवाढीचा निकाल सोमवारी लागेपर्यंत थांबता आले असते, पण गडबडीने उद्घाटन करून त्यामागे छुपी भाववाढ केली जात आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले. वर्सोवा-अंधेरी-घाटकोपर असा मेट्रो रेल्वेचा पहिल्या टप्प्याचा मार्ग असून या मार्गासाठी राज्य व केंद्राने आर्थिक साह्य केले आहे. बांधा, वापरा आणि हस्तांतर करा, या अटीवर रिलायन्सला मेट्रोचे काम देण्यात आले होते.
..तर उद्घाटनाला जाणार नाही : मुख्यमंत्री
रिलायन्सने मेट्रो रेल्वे भाडेवाढ केली, तर मी या उद्घाटनाला जाणार नाही. राज्य व केंद्र सरकारच्या मदतीवर ही रेल्वे उभी राहिली आहे, हे रिलायन्सने लक्षात ठेवावे, असा इशारा मुख्यमंत्र्यांनी दिला.
भाजपचा रास्ता रोको; खासदार शेट्टी पोलिसांच्या ताब्यात
मेट्रो रेल्वेचे उद्घाटन रविवारीच करावे, यासाठी भाजपच्या वतीने शनिवारी रास्ता रोको करण्यात आला. रास्ता रोको करण्यात पुढाकार घेणारे भाजपचे खासदार गोपाळ शेट्टी व किरीट सोमय्या यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. अनेक वर्षे रखडलेली ही रेल्वे मार्गी लावण्यासाठी रविवारी त्याचे उद्घाटन व्हावे, अशी आमची मागणी असल्याचे भाजपकडून स्पष्ट करण्यात आले.