(छायाचित्र: काही कल्पक नेटकरी मंडळीनी तर रवीना टंडनला मुंबई मेट्रोमध्येच ‘टीप टीप बरसा पानी’ या मोहरा चित्रपटाच्या गाण्यावर 'रेन डान्स' करायला लावले आहे.)
मुंबई- मागील महिन्यात मोठा गाजा-वाजा करून मुंबईकरांच्या सेवेत अर्पण झालेल्या मुंबई मेट्रोला पहिल्याच पावसात गळती लागल्याने टीकेची झोड उठली आहे. सोशल मिडियावर मुंबई मेट्रोबाबत तर प्रतिक्रियाचा 'पाऊस' पडत आहे. सोशल मिडियावर नेटक-यांनी मुंबई मेट्रोच्या 'शॉवर'खाली आंघोळ करतानाची चित्रे पोस्ट केली. तर कुणी मेट्रोचा मार्ग 'वॉटर किंग्डम'च्या दिशेने नेला. काही कल्पक नेटकरी मंडळीनी तर रवीना टंडनला मुंबई मेट्रोमध्येच ‘टीप टीप बरसा पानी’ या मोहरा चित्रपटाच्या गाण्यावर 'रेन डान्स' करायला लावले. एकूनच बुधवारी मुंबई मेट्रोला गळती लागल्याचे व नव्या को-या डब्यात पावसाचे पाणी आल्याने नेटक-यांनी सोशल मीडियावर मुंबई मेट्रोला 'धुऊन' काढले.
दरम्यान, मुंबई मेट्रोच्या डब्यात महिन्याभरातच गळती होऊ लागल्यानंतर याचे सामाजिक व राजकीय पडसाद उमटताच राज्य सरकारने याची गंभीर दखल घेतली आहे. विविध स्तरातून मुंबई मेट्रोबाबत टीका होऊ लागल्याने या प्रकरणाची मुख्यमंत्री कार्यालयाने रियालन्सकडे याची विचारणा करणार आहे. यामुळे हे मुंबई मेट्रो गळती प्रकरण मुंबई मेट्रो वन प्रायव्हेट लिमिटेडच्या रिलायन्स इन्फ्राला म्हणजेच अनिल अंबानींना चांगलेच भारी पडणार आहे.
गेल्या दहा वर्षापासून सुरु या प्रकल्पावर तब्बल 4321 कोटी रूपये खर्च केले आहेत. तसेच मोठा गाजा-वाजा करून मागील महिन्यातच मुंबई मेट्रो मुंबईकरांच्या सेवेत दाखल झाली आहे. ही मेट्रो सुरु करताना ती जागतिक दर्जाची असल्याचा दावा एमओपीएलकडून केला होता. मात्र, पहिल्याच महिन्यात गळती झाल्याने त्यांचीच पोलखोल झाली आहे.
दुसरीकडे, मुंबईतील माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांनी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, मुख्य सचिव आणि एमएमआरडीएकडे या प्रकरणाच्या चौकशीची मागणी केली होती. त्यानुसार मुख्यमंत्री कार्यालयाने याची गंभीर दखल घेत आपले पत्र नगरविकास खात्याकडे पुढील कारवाईसाठी पाठविले आहे. नगरविकास खाते रिलायन्सकडे याबाबत विचारणा करून पुढील कार्यवाहीची दिशा ठरवेल असे बोलले जात आहे.
पुढे पाहा, मुंबई मेट्रोबाबत नेटक-यांनी प्रतिक्रियाच्या माध्यमातून सोशल मिडियावर पाडलेला 'पाऊस'...