आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Mumbai Municipal Corporation Election, Shiv Sena Bjp Problem

उमेदवारी घोषित करण्यापूर्वीच नाराजांना बंडखोरीची लागण

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई: महत्प्रयासाने जागावाटपाचे सूत्र तयार करून शिवसेना-भाजप-रिपाइंने महायुतीची घोषणा केली खरी; परंतु मनासारखे वॉर्ड न मिळाल्याने भाजप, रिपाइंच्या नाराज कार्यकर्त्यांनी बंडखोरी करण्याचे ठरवलेले दिसते. तर काँग्रेसने इच्छुकांकडून तिकीट न दिल्यास बंडखोरी न करण्याचे हमीपत्र लिहून घेण्याचा धडाका लावला आहे.
शिवसेनेच्या दबावाखाली भाजपने आपले हक्काचे वॉर्ड सोडल्याने भाजप कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड नाराजी पसरली आहे. वरळी येथील 192 ची जागा भाजपच्या वाट्याला आली असतानाही भाजपने ती जागा शिवसेनेसाठी सोडल्याने भाजप कार्यकर्त्यांनी भाजप कार्यालयात घुसून तोडफोड आणि जाळपोळ करण्यापर्यंत मजल मारली होती. त्यापूर्वी वॉर्ड क्रमांक 134 शिवसेनेला सोडल्याने तेथील कार्यकर्त्यांनीही तोडफोड करून नाराजी व्यक्त केली. वरळी तोडफोड प्रकरणानंतर प्रदेश अध्यक्ष सुधीर मुनगंटीवार यांनी कार्यकर्त्यांची नाराजी दूर करण्याऐवजी त्यांनाच पक्षातून निलंबित केले. यामुळे भाजप कार्यकर्ते नाराज झाल्याचे कळते.
भाजपबरोबरच रिपाइं कार्यकर्तेही प्रचंड नाराज आहेत. रविवारी मुलुंड येथील रिपाइं कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त करण्यासाठी एक मोर्चा काढला. येथील कार्यकर्त्यांनी दिलेल्या माहितीनुसार मुलुंडमधील 6 जागांपैकी 3 जागा मिळाव्या, अशी मागणी रामदास आठवले यांनी केली होती. परंतु 3 तर सोडा एकही जागा शिवसेना-भाजपने रिपाइंला दिली नाही. या ठिकाणी दलित मतदार जास्त असताना आणि एक नगरसेवक असताना ही जागा मिळालीच पाहिजे. शिवसेना-भाजपच्या नेत्यांनी याचा विचार करावा. जागा सोडली नाही तर सर्वच्या सर्व 6 जागा बंडखोरी करून रिपाइं लढवेल, असा इशाराही त्यांनी भाजप-शिवसेना नेत्यांना दिला आहे. चेंबूरमधील जागेसाठीही दीपक निकाळजे आग्रही आहेत. बंडखोरीची लागण होऊ नये म्हणून काँग्रेसतर्फे इच्छुक उमेदवारांकडून हमीपत्र लिहून घेतले जात आहे.