आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Mumbai Municipal Corporation Hampered On Sidharth Vihar

'सिद्धार्थ'वर हातोडा! आंबेडकरी चळवळीचा मुंबईतील साक्षीदार पडद्याआड

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
छायाचित्र: मुंबई पालिकेच्या कर्मचा-यांनी सोमवारी सिद्धार्थ वसतिगृहावर हातोडा चालवला.
मुंबई - भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या पीपल्स एज्युकेशन संस्थेच्या वडाळा येथील ‘सिद्धार्थ विहार’ वसतिगृहाच्या इमारतीवर मुंबई पालिकेने सोमवारी अखेरचा घाव हाणला. एकेकाळी आंबेडकरी चळवळीचे केंद्र राहिलेल्या या इमारतीचा मुंबईतील धोकादायक इमारतींमध्ये समावेश करण्यात आला होता. पालिकेने या शिक्षण संस्थेस यापूर्वी इमारत रिकामी करण्यासाठी अनेकदा नोटिसाही बजावल्या होत्या.

पालिकेच्या एफ नॉर्थ विभागाच्या सहायक आयुक्त अलका ससाणे सोमवारी सकाळी या वसतिगृहात धडकल्या. त्यांच्यासोबत पोलिसांचा मोठा फौजफाटा होता. अचानक होत असलेल्या या कारवाईस वसतिगृहातील विद्यार्थ्यांनी विरोध करण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यांचा विरोध मोडून काढत पालिका कामगारांनी इमारत पाडण्याच्या कामास सुरुवात केली.डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शिक्षणाची संधी मिळावी म्हणून पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली. मुंबईत फोर्ट आणि वडाळा येथे या सोसायटीची महाविद्यालये आहेत. वडाळा येथे ‘सिद्धार्थ विहार’ वसतिगृह १९६४ साली सुरू करण्यात आले होते.

सिद्धार्थ वसतिगृहाचे उद्घाटन तत्कालीन केंद्रीय मंत्री छागला यांच्या हस्ते झाले होते. मागासवर्गीय समाजात शिक्षण घेऊ पाहणारी पहिली पिढी येथेच घडली. येथेच दलित पँथर संघटनेचा जन्म झाला. दलित चळवळीतील अनेक अनियतकालिके येथूनच निघत होती. दलितांवर होत असलेल्या गावागावातील हल्ल्यांचा प्रतिकार करण्यासाठी येथूनच भीमसैनिकांच्या झुंडी निघत होत्या.

कालांतराने पीपल्स सोसायटीच्या ट्रस्टीत वाद उद्भवले. त्यामुळे या वसतिगृहाची दुरुस्ती कधीही झाली नाही. त्यामुळे इमारत कमकुवत झाली होती. १९८५ पासून वसतिगृहात विद्यार्थ्यांना प्रवेश देणे संस्थेने बंद केले होते. पालिकेने या इमारतीचा समावेश धोकादायक इमारतींमध्ये केला होता. इमारत पाडण्यासंर्दभात वेळोवेळी नोटिसाही बजावल्या होत्या. तरी पीपल्सच्या ट्रस्टींनी पालिकेच्या नोटिसांकडे लक्ष दिले नाही.

येथे अनेक विद्यार्थी अनधिकृतरीत्या राहत होते. आंबेडकरी चळवळीतील काही कार्यकर्त्यांनी येथील खोल्या बळकावल्या होत्या. त्यांच्या दादागिरीपुढे पीपल्स प्रशासन हतबल झाले होते. त्यामुळे पालिकेनेच आज या इमारतीवर हातोडा हाणला.

‘हे तर बिल्डरांचे कारस्थान’
सिद्धार्थ पाडल्यानंतर नवे वसतिगृह बांधले जाणार नाही. येथे एसआरए प्रकल्प राबवला जाईल, अशी भीती आहे. त्यामुळे सिद्धार्थवरील कारवाईस आमचा विरोध आहे, अशी प्रतिक्रिया येथे राहत असलेल्या विद्यार्थ्यांचा नेता दिलीप गायकवाड याने ‘दिव्य मराठी’ला दिली.

आठवले आजपर्यंत ‘होस्टेलवासी’च
‘सिद्धार्थ’चे सुरुवातीचे नेतृत्व राजा ढालेंकडे होते. ढाले यांनी पँथर बरखास्त केली. त्यामुळे ५१ क्रमांकाच्या खाेलीत राहणा-या कवठे महांकाळच्या रामदास आठवलेंकडे नेतृत्व आले. आठवले पुढे आमदार- मंत्री झाले, पण त्यांनी खोली सोडली नव्हती.