आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Mumbai News In Marathi, Mumbai Municipal Corporation, Divya Marathi

आठवड्यात मुंबई खड्डेमुक्त होणार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - मुंबईतील 300 रस्ते खड्डेमुक्त करण्यात आले असून 250 रस्त्यांवरील खड्डे बुजवण्याचे काम प्रगतिपथावर आहे. शहरातील उर्वरित सर्व रस्ते 23 ऑगस्टपर्यंत खड्डेमुक्त करण्यात येतील. त्यासाठी 10 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आल्याची माहिती मुंबई महापालिकेने रविवारी मुंबईतील गणेशोत्सव नियोजनासंदर्भात आयोजित बैठकीत दिली.

दरवर्षीप्रमाणे मुंबईचे पालकमंत्री नसीम खान यांच्या उपस्थितीत रविवारी काजुपाडा येथील सेंट ज्यूड हायस्कूलमध्ये गणेशोत्सव आणि नवरात्रोत्सव मंडळांच्या पदाधिका-यांसमवेत पूर्वतयारी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. मुंबईतील गणेशमूर्ती महाकाय असतात. विसर्जन करण्यासाठी नेत असताना खड्ड्यांमुळे मूर्ती दुभंगण्याची शक्यता असते. त्यामुळे खड्डे बुजवण्याची नेहमीच एकमुखी मागणी होत असते.गणेशोत्सवाच्या तोंडावर पालिका खड्डे बुजवण्यासाठी खास निविदा काढते. तसेच असलेले खड्डे आणि बुजवलेले खड्डे याचा तासागणिक ऑनलाईन हिशोब ठेवण्यात येतो.

वन विंडो
गणेशोत्सव मंडळांना विविध परवानग्या मिळविण्यासाठी चकरा माराव्या लागतात. हे टाळण्यासाठी शहरातील महापालिका कार्यालये तसेच सर्व पोलिस ठाण्यांनी परवानग्यांसाठी एक खिडकी पद्धती (वन विंडो सिस्टम) सुरु करण्याचे आदेश खान यांनी दिले.

सीसीटीव्ही कॅमेरे
विसर्जनाची ठिकाणे, तलाव, चौपाट्या, जेट्टी आदी ठिकाणी सुरक्षिततेच्या दृष्टीने सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याची सूचना नसीम खान यांनी पोलिस विभाग आणि महापालिकेस केली.

जीवरक्षक नेमावेत
गणपती विसर्जनाच्या ठिकाणी भाविकांचे बुडून होणारे अपघात टाळण्यासाठी जीवरक्षक तैनात करा. पुरेश्या निर्माल्य कुंडांची व्यवस्था करण्यात यावी. भाविकांना पिण्याचे पाणी, स्वच्छतागृहे, कचरा निर्मुलनाची व्यवस्था, टेहळणी मनोरे, जीवरक्षक बोटी आदी व्यवस्था ठेवण्याचे निर्देश पालकमंत्र्यांनी महापालिका अधिका-यांना दिले.

लाऊडस्पीकर 4 दिवस
गणेशोत्सव काळात रात्री 12 वाजेपर्यंत लाऊडस्पीकर सुरू ठेवण्याची परवानगी राज्य शासनाने मागील वर्षी 2 दिवसांवरून 4 दिवसांपर्यंत वाढविली होती. यंदाही ही परवानगी 4 दिवसांसाठी देण्यात आल्यामुळे समन्वय समितीचे अध्यक्ष अ‍ॅड. नरेश दहिबावकर यांनी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचे आभार मानले.