नवी मुंबई- शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामना दैनिकाच्या नवी मुंबईतील वाशी येथील कार्यालयावर काही अज्ञातांनी दगडफेक केली आहे. तर ठाणे येथील कार्यालयावर शाईफेक करण्यात आल्याची माहिती आहे. नवी मुंबईत तीन तरुणांनी दोन दुचाकींवरून येऊन ही दगडफेक केली असल्याचे सांगण्यात येत आहे. वाशीमध्ये सामनाची प्रेस आहे.
का केली दगडफेक..
राज्यात सध्या निघत असलेल्या सकल मराठा समाजाच्या मूक मोर्चावर सामना या मुखपत्रात वादग्रस्त व्यंगचित्र प्रकाशित करण्यात आले. यामुळे ठिकठिकाणी मराठा समाजबांधव संताप व्यक्त करताना दिसून येत आहेत. त्याच रागातून ही दगडफेक झाल्याचे सांगितले जात आहे. या वादग्रस्त कार्टूनमुळे राज्यात ठिकठिकाणी सामना पेपर जाळून निषेध नोंदवला जात आहे.
संभाजी ब्रिगेडने स्वीकारली हल्ल्याची जबाबदारी..
सामनाच्या कार्यालयावर झालेल्या हल्ल्याची जबाबदारी ही संभाजी ब्रिगेडने स्वीकारली आहे. ‘सामना’ने मराठा समाजाची व महिलांची बदनामी केली, असा आरोप संभाजी ब्रिगेडने केला.