आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाइट लाइफला गृह विभागाचा विरोध, कायदा व सुव्यवस्था बिघडण्याची भीती

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या संकल्पनेतून आकार घेत असलेल्या मुंबईतील नाइट लाइफला उच्च न्यायालयाने खो दिला असतानाच आता गृह विभागातील अधिकाऱ्यांनीही या योजनेला विरोध केल्याचे समजते. केवळ मूठभर लोकांसाठी नाइट लाइफ सुरू करून अगोदरच तणावात असलेल्या पोलिसांवर आणखी तणाव का वाढवायचा, असा प्रश्न हे अधिकारी विचारत आहेत. विशेष म्हणजे मुंबईच्या पोलिस आयुक्तांनी आदित्य ठाकरे यांच्या या योजनेला पाठिंबा दर्शवत सुरक्षा प्रदान करण्यास तयार असल्याचे म्हटले आहे. आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावर काय निर्णय घेतात, याकडे सगळ्यांचे लक्ष लागलेले आहे.
मुंबई महापालिकेने या योजनेला मंजुरी दिल्यानंतर पोलिस आयुक्त राकेश मारिया यांनीही रात्रीची कायदा व सुव्यवस्था सांभाळण्यास पोलिस सक्षम असल्याचा दावा केला होता. त्यानंतर या प्रस्तावावर गृह विभागाचेही मत मागवण्यात आले होते. मात्र नाइट लाइफमुळे दारूची विक्री आणि मद्यपींची संख्या वाढण्याची शक्यता असून त्यातूनच एखादे दिल्लीसारखे "निर्भया’ प्रकरण घडून कायदा व सुव्यवस्था बिघडेल, अशी भीती व्यक्त करत या प्रस्तावाला विरोध असल्याचे मत गृह विभागाने नोंदवले आहे.

कामाचा ताण वाढेल
गृह विभागातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले, ‘पोलिसांवर अगोदरच वर्षभर अनेक कामांचा ताण असतो. त्यात नाइट लाइफ सुरू झाल्यानंतर त्यांचा ताण आणखीनच वाढेल. नाइट लाइफमुळे गुन्हे वाढणार असल्याने आमचा या योजनेला विरोध आहे. सगळ्याच सनदी अधिकाऱ्यांचा या गोष्टीला विरोध आहे. नाइट लाइफ हे फक्त मूठभर लोकांसाठी आहे. यामध्ये कॉल सेंटरमध्ये काम करणारे वा उच्चभ्रूंचा मोठ्या प्रमाणावर समावेश असेल. महिलांच्या छेडछाडीच्या घटना होत असताना रात्री कमी गर्दी असताना या घटनांमध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.