आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Mumbai Has Been Put On High Alert After Intelligence Agencies Warned Of Pakistan Based Jihadi Outfits Trying To Attack

मुंबईतील लोकल रेल्वे व हॉटेल्सवर दहशतवादी हल्ल्याचे सावट; लोहमार्ग पोलिसांचा इशारा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- मुंबईतील लोकल रेल्वे व हॉटेल्सवर काही दहशतवादी संघटना हल्ला करण्याच्या तयारीत असल्याची माहिती रेल्वे पोलिसांना मिळाली आहे. हा हल्ला करण्याबाबत लष्कर- ए- तोयबा तयारी करीत असून, आगामी दोन-तीन महिन्यात हल्ला करण्याबाबत कट शिजत असल्याचे रेल्वे पोलिसांच्या जीआरपी विभागाने म्हटले आहे. जीआरपीने याबाबतचा अलर्ट राज्यातील सुरक्षा यंत्रणांना दिला असून सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
रेल्वे पोलिसांच्या जीआरपीने विभागाने याबाबतचा अलर्ट महाराष्ट्र पोलिस, सीयआडी, शहर पोलिस, रेल्वे पोलिस यांना दिला आहे. या हल्ल्यात मुंबईत सर्वाधिक गर्दीचे ठिकाण असलेल्या लोकल्स रेल्वे यांना लक्ष्य केले जाणार असल्याचे अलर्टमध्ये म्हटले आहे. आगामी दोन-तीन महिन्यात हा हल्ला करण्याचे नियोजन असून त्यासाठी लष्कर-ए-तोयबाचे 8 ते 10 दहशतवादी ट्रेनिंग घेत असल्याचे म्हटले आहे.
जीआरपीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात लष्कर-ए- तोयबा या दहशतवादी संघटनेचे पत्र गुप्तचर यंत्रणेच्या हाती लागले आहे. यावरून गुप्तचर यंत्रणांनी सर्वच राज्यांना अलर्ट करत पुढील काही महिन्यांत दहशतवादी हल्ल्याची शक्यता वर्तविली आहे. या पत्रात 8 ते 10 दहशतवादी समुद्र मार्गाने मुंबईत प्रवेश करून 26/11सारख्या हल्ल्याप्रमाणे लोकल रेल्वे स्थानके आणि हॉटेल्समध्ये मोठा दहशतवादी हल्ला करण्याच्या तयारीत असल्याचे म्हटले आहे.
लष्कर-ए-तोयबाचा कमांडर झकीउर रेहमान लख्वी याची नुकतीच पाकिस्तानमधील कारागृहातून सुटका झाली आहे. त्यामुळे दहशतवादी संघटना पुन्हा सक्रीय होण्याच्या तयारीत असल्याचे सांगण्यात येत आहे.