आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'मोनो डार्लिंग\'कडे मुंबईकरांची दुस-याच दिवशी पाठ, फीडर बसची नितांत गरज

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- देशाची पहिली मोनो रेल्वे सेवा रविवारपासून सुरु झाली. मोनो रेल्वेमधून प्रवास करण्यासाठी मुंबईकर रविवारी खूपच उत्सुक दिसत होते. मोनोने प्रवास करायला मिळावा म्हणून काही मुंबईकर रविवारी पहाटे दोन वाजल्यापासून रांग लावून थांबले होते. पहिल्या दिवशी सुमारे वीस हजार प्रवाशांनी मोनो रेल्वे सफरीचा आनंद लुटला. यातील बहुतेकांनी मोनो रेल्वेचा प्रवास कसा असतो व आमची मुंबई मोनो रेल्वेच्या उंच मार्गावरून कशी दिसते हे पाहण्यासाठी आलो असल्याचे सांगितले.
दरम्यान, आज सकाळपासून कालच्या प्रमाणात मोनो रेल्वेसाठी प्रवाशांचा शुकशुकाट असल्याचे दिसून येत आहे. वडाळा ते चेंबूर या मार्गावर सहा स्थानके आहेत. मात्र या स्थानकांमधून वेगवेगळ्या ठिकाणी जाण्यासाठी कोणतीही व्यवस्था आणि फीडर बस नसल्याने प्रवाशी मध्येच अडकून राहण्याची भीती आहे. त्यामुळे चाकरमान्यांकडून आपल्या कार्यालयाची वेळ गाठण्यासाठी लोकल व इतर साधनांचा वापर होत असल्याचे दिसत आहे.
याचबरोबर मोनो रेल्वेला सध्या पास सुविधा नाही. चाकरमान्यांनी लोकलचा पास आधीच काढला असल्याने अनेकांनी मोनोकडे सध्या तरी पाठ फिरवली आहे. मात्र काही महिन्यांनतर मोनोकडे प्रवाशांचा हळू-हळू ओढा वाढेल, असा एमएमआरडीएला विश्वास आहे. या कालावधीदरम्यान, मुंबई पालिकेच्या बेस्टच्या गाड्या फीडर बस म्हणून उपलब्ध करून देण्याचा एमएमआरडीएचा विचार आहे. त्यामुळे त्यानंतर मोनो रेलचा प्रवास मुंबईकरांना भावेल असे सांगितले जात आहे.
वडाळा ते चेंबूर हे अंतर 8 किलोमीटरपेक्षा जास्त आहे. यासाठी 20 मिनिटांचा कालावधी लागतो. सध्या सकाळी 7 ते दुपारी 3 पर्यंतच मोनो रेल्वे सेवा देण्यात येत आहे. काही कालावधीनंतर ही सेवा पहाटे 5 ते रात्री 12 पर्यंत उपलब्ध करून देण्यात येणार आहे.