आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘टेकफेस्ट’च्या रोबो वॉरमध्ये औरंगाबादी ठसा!

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई आयआयटीतर्फे प्रत्येक वर्षी आयोजित करण्यात येत असलेल्या टेकफेस्टला यंदा अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. तीन दिवसांच्या या टेकफेस्टला देशभरातील जवळजवळ 90 हजार विद्यार्थ्यांना हजेरी लावून नवीन शोधांची माहिती घेतली. विद्यार्थ्यांमध्ये संशोधनाची आवड निर्माण व्हावी, या हेतूने टेकफेस्टचे आयोजन केले जाते. यात ओ-झोनसारख्या धमाल कार्यशाळांबरोबर विज्ञान-तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातील मान्यवरांची व्याख्यानमालाही आयोजित करण्यात येते.
रसायनशास्त्राचे नोबेल पारितोषिक विजेते वेंकटेश रामकृष्णन यांचे व्याख्यान झाले. विद्यार्थ्यांमध्ये वेंकी नावाने प्रख्यात असलेल्या वेंकींनी आपल्या भाषणात भारतात इंजिनिअरिंगची पदवी घेऊन परदेशात आणि मोठ्या कॉर्पोरट कंपन्यांमध्ये भल्या मोठ्या पगारावर नोकरी करण्याचे स्वप्न पाहणाºया विद्यार्थ्यांना चांगल्याच कानपिचक्या दिल्या. त्यांनी म्हटले की, आयआयटीच्या विद्यार्थ्यांवर केंद्र सरकार प्रचंड खर्च करते. या विद्यार्थ्यांकडून जी फी घेतली जाते ती जे शिक्षण दिले जाते त्यामानाने खूपच कमी आहे. आयआयटीतील विद्यार्थ्यांनी मोठ्या पगाराच्या मागे लागण्यापेक्षा भारताच्या विकासासाठी आपले आयुष्य वेचले पाहिजे. त्यांचे हे उद्गार अनेकांना पटले नाहीत, परंतु वेंकी खरे तेच बोलले.
यंदाचा टेकफेस्ट भारत-पाकिस्तानमधील विद्यार्थ्यांची मने जुळावीत म्हणून दोन्ही देशांतील विद्यार्थ्यांना मते मांडण्यासाठी उम्मीद-ए-मिलाप कार्यक्रम हाती घेण्यात आला होता. दोन्ही देशांमधील संबंध कसे सुधारता येतील यावर विद्यार्थ्यांची मते जाणून घेण्यासाठी मुंबईतील महाविद्यालयांमध्ये एक संदेशवही फिरवण्यात आली होती. या वहीत 2 हजारांपेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी आपले संदेश लिहिले. पाकिस्तानमधीलही जवळजवळ दीड हजार विद्यार्थ्यांनी आपले संदेश या अनोख्या उपक्रमासाठी पाठवले होते.
टेकफेस्टमध्ये विविध प्रदर्शनांबरोबरच स्पर्धांचेही आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये सगळ्यात महत्त्वाची स्पर्धा होती रोबो वॉर. या स्पर्धेत 70 पेक्षा जास्त रोबो देशभरातील कॉलेजेसमधील विद्यार्थ्यांना उतरवले होते. मात्र या सगळ्या रोबोंवर औरंगाबादच्या शासकीय इंजिनिअरिंग कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी बनवलेल्या रोबोने मात केली आणि अजिंक्यपद पटकावले. गेल्या वर्षी या विद्यार्थ्यांना उपांत्यपूर्व फेरीपर्यंतच मजल मारता आली होती. ज्याप्रमाणे कुस्तीच्या स्पर्धा असतात, अगदी तशाच पद्धतीचे हे रोबोवॉर असते. फक्त 3 मिनिटांत समोरच्या रोबोला उचलून फेकायचे असते. शासकीय कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी बनवलेला हा रोबो 36.5 किलोंचा होता. हा रोबो बनवण्यासाठी हेवी मोटर्स आणि न्यूमॅटिक लाँचरचा वापर करण्यात आला होता. ग्राइंड मास्टर प्रा. लि. आणि मराठवाडा आॅटो कॉम्प प्रा. लि. या कंपन्यांनी या रोबोसाठी अर्थसाहाय्य केले होते.
कॉलेज विद्यार्थ्यांबरोबरच शालेय विद्यार्थ्यांमध्ये रोबोटिक्सची आवड निर्माण व्हावी म्हणून यप्स उपक्रमाअंतर्गत एका स्पर्धेच आयोजन करण्यात आले होते. यासाठी शालेय विद्यार्थ्यांकडून रोबो तयार करवण्यात आले होते. वॉल ई नावाने आयोजित या स्पर्धेत एकूण 134 संघ सहभागी झाले होते. व्ही. एन. सुळे गुरुजी विद्यालयातील तीन विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या रोबोला सुवर्णपदकाने सन्मानित करण्यात आले. सार्थक साळुंखे, विराज नाडकर्णी, पंकज महाडकर या विद्यार्थ्यांना सुवर्णपदक प्राप्त झाले. विशेष म्हणजे हे तिघेही आठवीचे विद्यार्थी आहेत.
फुल्ल थ्रोटल स्पर्धेत रिमोटवर चालणाºया गाड्यांची रेस आयोजित करण्यात आली होती. आयआयटीच्या विद्यार्थ्यांनीच या गाड्या तयार केल्या होत्या. रोबोवॉर्स, डेव्हिल डोझर, मॅग्नेटो, फ्राइटर 15 अशा काही स्पर्धांचेही आयोजन करण्यात आले होते. त्याचप्रमाणे 16 देशांतून 40 नवीन उपकरणे येथे मांडण्यात आली होती.
फ्रान्समधील रोबो सगळ्यांचे लक्ष वेधून घेत होता. विद्यार्थी जास्त वेळ या रोबोसमोर उभे राहून त्याच्या करामती पाहण्यातच दंग होते. आयोजकांना या रोबोच्या स्टॉलसमोरून विद्यार्थ्यांना अक्षरश: ढकलावे लागत होते. रिमोटच्या साहाय्याने हा रोबो सॅल्यूट करी, मांडी घालून बसे, रागवे, रोमांचित होई. या रोबोची किंमत जवळजवळ 15 लाख रुपये असल्याचे सांगण्यात आले. ‘थ्री इडियट्स’ चित्रपटामुळे लोकप्रिय झालेले क्रेझीकॉप्टरही टेकफेस्टच्या आकर्षणाचा बिंदू होते. मात्र येथे एक बाय एक इंचाचे क्रेझीकॉप्टर मांडण्यात आले होते. जर्मनीतील जॉन्स आणि बेन्नोचे टीएनटी रोबोटिक्स फुटबॉल खेळताना पाहून सगळे थक्क होत होते. एकूणच यंदाचा टेकफेस्ट शाळकरी विद्यार्थ्यांसाठी एक अनोखी पर्वणीच घेऊन आला होता.