आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ललित मोदींची भेट घेतल्याने मुंबई पोलिस आयुक्त अडचणीत

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - आयपीएलचे माजी प्रमुख ललित मोदी यांच्याशी संबंधित वादात केंद्रीय मंत्री सुषमा स्वराज आणि राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांच्यानंतर आता मुंबईचे पोलिस आयुक्त राकेश मारिया हेसुद्धा अडकण्याची चिन्हे आहेत. मागच्या वर्षी जुलै महिन्यात मारिया यांनी लंडनमध्ये ललित मोदी यांची भेट घेतली होती. यावर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्याकडून स्पष्टीकरण मागितले आहे. विशेष म्हणजे खुद्द मारिया यांनीच मोदी यांची भेट घेतल्याचा खुलासा केला आहे. ते म्हणाले, जुलै महिन्यात एका कार्यक्रमासाठी मी लंडनला गेलो होतो. तेव्हा मोदी यांच्या वकिलांच्या विनंतीवरून त्यांची भेट घेतली. सुमारे १५ ते २० मिनिटांच्या या भेटीदरम्यान मोदी यांनी अंडरवर्ल्डकडून जीवितास धोका असल्याचे सांगत मदत मागितली होती. लंडनहून परतताच मारिया यांनी तत्कालीन गृहमंत्र्यांना या भेटीची माहिती दिली होती. दरम्यान, २००९-१० मध्ये मोदी यांना मारण्याचा अंडरवर्ल्डचा कट मुंबई गुन्हे शाखेने उधळून लावला होता.

राजघराण्याच्या नावाचा वापर
लंडन - ब्रिटनच्या माध्यमातील वृत्तांनुसार, ब्रिटन दौर्‍याचे दस्तऐवज मिळवण्यासाठी ललित मोदी यांनी युवराज चार्ल्स आणि त्यांचे बंधू अँड्रयू यांच्यासह राजघराण्यातील सदस्यांच्या नावांचा वापर केला होता. द संडे टाइम्स या वृत्तपत्रानुसार, ड्यूक ऑफ यॉर्क आणि राणी एलिझाबेथ द्वितीय यांचे द्वितीय चिरंजीव अँड्रयू यांची मोदींशी अनेक वर्षांपासून ओळख होती. दौर्‍याचे दस्तऐवज जारी होण्यापूर्वी ते मोदींच्या लंडनमधील घरीही गेले होते. मात्र, दोघांतील चर्चेची माहिती उघड करण्यास राजघराण्याकडून नकार देण्यात आला.

सिंहांशी व्यावसायिक संबंध
वॉशिंग्टन - "ललित मोदी यांच्याशी संबंधित वादात मला काही सांगायचे नाही. मात्र, भाजप खासदार दुष्यंत सिंह यांच्यासोबत मोदींनी केलेला ११ कोटींचा व्यवहार हा व्यावसायिक होता. यासाठी बँकेच्या वास्तविक प्रक्रियेचेही पालन करण्यात आले होते. त्याच्याशी सरकारचा काही संबंध नाही,' असे मत केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी मांडले आहे. राजस्थानच्या मुख्यमंत्री वसंुधरा राजे यांचे पुत्र दुष्यंत याप्रकरणी वादात अडकले आहेत. ललित मोदींनी २००८ मध्ये त्यांच्या कंपनीत ११.६३ कोटी रुपयांची गुंतवणूक केली होती.

भारतीयास भेटणे गुन्हा आहे काय ?
‘आयपीएल’चे माजी अध्यक्ष अध्यक्ष ललित मोदी यांच्याशी राष्ट्रवादीच्या नेत्यांचे संबंध असल्याचा आरोप काँग्रेस करत आहे, याबाबत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना िवचारले असता ते म्हणाले की, ‘ललित मोदींबाबतचा वाद अनाठायी आहे. एखाद्या भारतीय माणसाला भेटणे हा काही गुन्हा आहे का? त्यांच्याबाबत विनाकारण राजकारण सुरू आहे.’