(छायाचित्र: राकेश मारिया)
मुंबई- मुंबई पोलिस दलात कार्यरत असलेल्या सर्व पोलिस कर्मचा-यांची येत्या 10 मे पर्यंत मानसिक व शारीरिक तपासणी करा, असे आदेश मुंबईचे पोलिस आयुक्त राकेश मारिया यांनी दिले आहेत. सुट्टीच्या वादावरून मुंबईतील वाकोला पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक विलास जोशी व सहाय्यक फौजदार दिलीप शिर्के यांच्यात वाद झाला. त्या वादातून शिर्के यांनी विलास जोशी यांच्यावर गोळ्या झाडल्या व स्वत:वरही गोळ्या झाडून आत्महत्या केली. उपचारादरम्यान विलास जोशी यांचाही मृत्यू झाला. दरम्यान, हत्या आणि त्यानंतर आत्महत्या केल्यानंतर या घटनेने पोलिस दलासह महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही पोलिसांवर अतिरिक्त ताण आहे काय व त्यासाठी काय करता येईल याचे उपाय सुचविण्याचे आवाहन समाजातील घटकांना केली आहे. पोलिसांना 12 तासांपेक्षा जास्त ड्युटी असल्याने व कौटुंबिक वेळ काढू शकत नसल्याने पोलिस अधिका-यांसह कर्मचारीही तणावात राहतात असे निरीक्षणे नोंदविण्यात आली आहेत. अनेक पोलिस मानसिक व शारीरिक पातळीवर तणावात असल्याने मुंबईचे पोलिस आयुक्त राकेश मारिया यांनी मुंबई पोलिस दलातील सर्व पोलिस कर्मचा-यांची मानसिक तपासणी करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच ही तपासणी आठवड्याभरात पूर्ण करून 10 मे पर्यंत अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत.
सहायक पोलिस निरीक्षक दिलीप शिर्के यांच्या गोळीबारात गंभीर जखमी झालेले वरिष्ठ पोलिस निरीक्षक विलास जोशी यांचा रविवारी उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. या हल्ल्यात जखमी झालेले बाळासाहेब अहिर यांच्यावर उपचार सुरू आहेत. शिर्के यांनी शनिवारी संध्याकाळी पोलिस ठाण्यात येऊन जोशी यांच्याशी वाद घातला. त्यावेळी जोशी ठाण्याबाहेर पडत असताना शिर्केंनी सर्व्हिस रिव्हॉल्व्हरने त्यांच्या पाठीवर दोन गोळ्या, तर आहिर यांच्यावर एक गोळी झाडली. नंतर लगेच स्वत:वरही गोळी झाडून आत्महत्या केली. जोशी आणि आहिर यांना लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात होते. यात जोशी यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ऑपरेटर आहिर यांच्यावर सध्या उपचार सुरु आहेत. त्यांच्या पायात गोळी घुसली आहे.