मुंबई- मुस्लिम समाजाबाबत पक्षपाती भूमिका घेत असल्याने पोलिसांवर या समाजाचा विश्वास उरलेला नाही, असा अहवाल केंद्राला सादर करून राज्याचे पोलिस महासंचालक संजीव दयाळ यांनी खळबळ उडवली आहे. प्रत्यक्षात हिंदू-मुस्लिम यांच्यात संवाद सौदार्हपूर्ण संवाद राखण्यात यशस्वी ठरलेली मोहल्ला कमिटीच दयाळांनीच बंद केल्याचे वास्तव केल्याचे उघडकीस आले आहे. महासंचालक विश्वास निर्माण करण्याबाबत उदासीन असताना काँग्रेस आघाडीच्या सरकारनेही केवळ बघ्याची भूमिका घेत दयाळांच्या कृतीला पाठिंबाच दिल्याचेही स्पष्ट झाले आहे.
पोलिसांच्या पक्षपाती भूमिकेमुळे मुस्लिम मुख्य प्रवाहापासून दूर गेला असल्याचे दयाळ यांच्यासह तीन राज्यांमधील पोलिस महासंचालकांनी केंद्राला दिलेल्या अहवालात नमूद केले आहे.
मुस्लिमांमध्ये पोलिसांबद्दल विश्वास वाढविण्यास उपयुक्त ठरणारा मोहल्ला समितीचा उपक्रमच दयाळांनी बंद केला, असा दावा माजी पोलिस अधिकारी सुरेश खोपडे यांनी केला. 1992 मध्ये बाबरी मशीद विध्वंसानंतर मुंबईत जातीय हिंसाचाराचा भडका उडाला. मुस्लिमांची मोठी संख्या असलेल्या भिवंडीत मात्र सलोखा आणि शांतता होती. याचे श्रेय त्या वेळेस भिवंडीचा कारभार हाकणारे खोपडे आणि त्यांच्या कल्पनेतून तयार झालेल्या मोहल्ला समितीला जाते.
समितीत हिंदूंचाही सहभाग
या समितीत हिंदू-मुस्लिम धर्मातील त्या-त्या भागातील प्रमुखांचा समावेश होता आणि या समितीच्या पोलिसांसह नियमित बैठका होत असल्याने दोन्ही धर्मीयांचा परस्परांवर तसेच पोलिसांवरही विश्वास बसला होता.
अतिवरिष्ठ पोलिस अधिकार्यांनीच पुढाकार घेऊन मुस्लिम समाजाचा पोलिसांबाबतचा संशय दूर केलाच, तरच भविष्यात ही परिस्थिती सुधारू शकते. याविषयी खोपडे म्हणतात, दयाळ यांचा हा शोध काही नवीन नाही. उलट मी म्हणेन पोलिस शिपाई, पोलिस निरीक्षक आणि तत्सम तिसर्या व दुसर्या फळीतील पोलिसांना याबाबत दोषी धरता येणार नाही. मुळात याबाबत सनदी अधिकारी तसेच सनदी पोलिस अधिकारी यांनीच मुस्लिम समाजाचा पोलिसांबाबतचा गैरसमज दूर करण्यासाठी काहीच केले नाही. अहवाल देणे सोपे आहे, पण त्यासाठी थेट लोकांमध्ये जाऊन काम करणे वेगळे असल्याचे ते म्हणाले.
पोलिसांच्या प्रशिक्षणाला सुरुवात
>मुस्लिम समाजाचा पोलिसांबाबतचा अविश्वास देशहिताचा नाही. पोलिसांकडून अविश्वास दूर करण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. यासाठी रीतसर प्रशिक्षण दिले जात आहे. मात्र, अजूनही खूप काम करण्याची गरज आहे. एक महिन्यापूर्वी महाराष्ट्रात सोशल मीडियावरून मुस्लिम समाजाला लक्ष्य करण्याचा प्रयत्न करण्यात आला. अशा प्रकारांना पोलिसांनी वेळीच आवर घालायला हवा होता; पण तसे झाले नाही आणि तेढ निर्माण झाली. मुस्लिमांना त्यांच्या जिवाची, घराची, कुटुंबीयांची, मालमत्तेची हमी हवी आहे. बाकी फार अपेक्षा नाहीत. मुस्लिमांना पोलिसांबद्दल विश्वास मिळाला, तरच हे चित्र बदलू शकते.
- मुनाफ हकीम, राज्य अल्पसंख्याक आयोग अध्यक्ष
आताच बोलू शकत नाही
मी सध्या मुंबईबाहेर असून एका बैठकीत आहे. आणखी काही दिवस मी बाहेर आहे. त्यामुळे मी या विषयावर आताच काही बोलू शकत नाही, असे पोलिस महासंचालक संजीव दयाळ म्हणाले.