Home | Maharashtra | Mumbai | mumbai & pune byelection Municipal Corporation Result Live News

पोटनिवडणूक निकाल: मुंबई, पुणे, नागपूर, कोल्हापूरात भाजप विजयी, भांडूपमध्ये शिवसेनेला धक्का

दिव्यमराठी वेब टीम | Update - Oct 12, 2017, 11:51 PM IST

मुंबईत भाजपच्या जागृती पाटील, पुण्यातील कोरेगाव पार्कमधून भाजप-रिपाइंच्या हिमानी कांबळे विजयी झाल्या.

 • mumbai & pune byelection Municipal Corporation Result Live News
  पुण्यातील कोरेगाव पार्क पोटनिवडणूकीत हिमानी कांबळे यांनी विजय मिळवला आहे.
  मुंबई/पुणे/कोल्हापूर- मुंबई महापालिका, पुणे महापालिका, नागपूर आणि कोल्हापूर महापालिकेत झालेल्या एका-एका पोटनिवडणुकीचे निकाल हाती आले आहेत. मुंबईत भाजपच्या जागृती पाटील यांनी मोठा विजय मिळवला. तर पुण्यातील कोरेगाव पार्कच्या पोटनिवडणुकीत भाजप-रिपाइंच्या हिमानी कांबळे विजयी झाल्या आहेत. कोल्हापूर महानगरपालिकेच्या प्रभाग 11 मधील पोटनिवडणुकीत भाजप-ताराराणी आघाडीचे उमेदवार रत्नेश शिरोळकर यांनी विजय मिळवला आहे. नागपूरातही भाजप विजयी झाला आहे.
  भाजप-रिपब्लिकन पक्षाने राखली पुण्यातील जागा
  उपमहापौर नवनाथ कांबळे यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या प्रभाग क्रमांक २१ च्या पोटनिवडणुकीत त्यांच्या कन्या व भाजप-रिपाइंच्या उमेदवार हिमाली कांबळे यांनी दणदणीत विजय मिळवला. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या धनंजय गायकवाड यांचा ४ हजार ४७३ मतांनी पराभव केला.
  मुंबई- भांडूप पोटनिवडणुकीत शिवसेनेला धक्का-
  मुंबईतील भांडुप येथील प्रभाग क्रमांक 116 च्या पोटनिवडणुकीचीही मजमोजणी सुरू झाली आहे. तेथे भाजपच्या जागृती पाटील यांनी मोठा विजय मिळवला आहे. या पोटनिवडणूकीत शिवसेनेकडून मीनाक्षी पाटील, भाजपकडून जागृती पाटील आणि काँग्रेसकडून प्रमिला सिंह मैदानात होत्या. काँग्रेसच्या नगरसेविका प्रमिला पाटील यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेवर पोटनिवडणुक लागली होती. बुधवारी त्याच्यासाठी मतदान झाले. जागृती पाटील यांना 11 हजार 129 मते तर, शिवसेनेच्या मीनाक्षी पाटील 6 हजार 337 मते मिळाली.भाजपच्या जागृती पाटील यांनी शिवसेनेच्या उमेदवार मीनाक्षी पाटील यांचा 5 हजार मतांच्या फरकाने पराभव केला. यामुळे शिवसेनेला मोठा धक्का बसला.
  भाजपप्रणीत ताराराणी अाघाडीने जागा राखली
  काेल्हापूरमधील प्रभाग क्रमांक ११ मधील पाेटनिवडणुकीत भाजप- ताराराणी आघाडीचे रत्नेश शिरोळकर २०० मताने विजयी झाले. त्यांनी राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष व अपक्ष उमेदवार राजेश लाटकर यांचा पराभव केला. शिरोळकर यांना १,३९९ तर लाटकर यांना १,१९९ मते पडली.अाघाडीचे नीलेश देसाई यांचा जातीचा दाखला अवैध ठरल्यामुळे या प्रभागात पाेटनिवडणूक घेण्यात अाली.

  नागपुरात काँग्रेस पराभूत
  उपराजधानीतील प्रभाग क्रमांक ३५ मधील पाेटनिवडणुकीत भाजप उमेदवार संदीप गवई यांनी ५ हजार ७११ मते घेऊन काँग्रेसचे पंकज थोरात यांचा ४६३ मतांनी पराभव केला. भाजपचे नगरसेवक निलेश कुंभारे यांच्या निधनामुळे ही पोटनिवडणूक घेण्यात आली.
 • mumbai & pune byelection Municipal Corporation Result Live News
  कोल्हापूर महानगरपालिकेच्या प्रभाग 11 मधील पोटनिवडणुकीत भाजप-ताराराणी आघाडीचे उमेदवार रत्नेश शिरोळकर यांनी २०० मतांनी विजय मिळवला आहे.
 • mumbai & pune byelection Municipal Corporation Result Live News
  मुंबईतील भांडुप येथील प्रभाग क्रमांक ११६ च्या पोटनिवडणुकीत भाजपच्या जागृती पाटील विजयी झाल्या.

Trending