मुंबई- राज्य सरकारच्या पायाभूत सुविधा समितीने मंजुरी दिल्याने सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अखत्यारीतील मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेच्या विस्तारीकरणाचे काम पुढील पावसाळ्यानंतरच सुरु होईल.
विस्तारीकरणामुळे मुंबई-पुणे शहरांदरम्यानचे अंतर 6 किलोमीटरने कमी होऊन प्रवासाचा वेळ 25 मिनिटांची वाचणार आहे. विस्तारीकरणात दोन बोगदे बांधले जाणार असल्याने घाटातील अपघातांचे प्रमाण व वाहतूक कोंडी कमी होणार आहे. या प्रकल्पासाठी वनखात्याच्या काही जमिनीची आवश्यकता आहे. त्यासाठी परवानगी मिळावी म्हणून या खात्याकडे सहा महिन्यांपूर्वी महामंडळाने प्रस्ताव पाठवला आहे. मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेच्या विस्तारीकरणास वनखात्याकडून परवानगी मिळाल्यानंतर पुढील दोन महिन्यांत निविदा मागवल्या जातील. कोणताही प्रकल्प किमान दोन ते कमाल चार वर्षांत पूर्ण करण्याचे महामंडळाचे लक्ष्य असल्याने प्रकल्प पूर्ण होण्यास सन 2020 ते 2022 पर्यंत प्रतीक्षा करावी लागेल, असे दिसते. प्रकल्पासाठी 4800 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.