आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘एक्स्प्रेस वे’वर दरडी कोसळण्याआधीच इशारा, सेन्सर काम करणार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील डोंगर भागातून वाहने सुरक्षित जावीत म्हणून दरड कोसळण्याअगोदर सायरन वाजवून प्रवाशांना धोक्याची जाणीव करून दिली जाणार आहे. हा सायरन धोकादायक वाटणाऱ्या दरडींमध्ये लावलेल्या सेन्सरद्वारे कळणार आहे.

गेल्या रविवारी लोणावळ्यानजीक अडोशी बोगद्याच्या तोंडावर दरड कोसळून २ प्रवाशांचा मृत्यू झाला होता. या घटनेमुळे द्रुतगती मार्गावरील सुरक्षिततेबाबत सरकारवर टीका सुरू आहे. सोमवारी सार्वजनिक बांधकाममंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे सुरक्षेच्या उपाययोजनांबाबत सादरीकरण झाले.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दरड कोसळली त्या ठिकाणी जाळी चांगल्या पद्धतीने न लावल्याने हा अपघात झाला होता. जाळ्या लावण्याचे काम गोदरेज रोप्स कंपनीकडे होते आणि या जाळ्यांची आयुष्यमर्यादा २०१३ मध्येच संपुष्टात आली होती. परंतु त्याकडे कोणी लक्ष दिले नव्हते. या जाळ्यांसाठी फक्त दोन मीटरवर खिळे मारण्यात आले होते. मात्र, गेल्या काही वर्षात ते दगडातून बाहेर आल्याने दरड कोसळली. आता जाळे लावताना १२ मीटर आतपर्यंत खिळे मारले जाणार आहेत. या क्षेत्रातील तज्ज्ञ कंपनी आयसोफर आणि जिओग्रुपने एकनाथ शिंदे यांच्याकडे याबाबत सादरीकरणही केले. द्रुतगती मार्गावर जमिनीखालून बोगदे बांधण्याचीही योजना आहे.

सेन्सर कसे काम करणार?
धोकादायक दरडींच्या ठिकाणी सेन्सर लावले जातील. दरड कोसळण्याची शक्यता असल्यास त्या ठिकाणी सायरन वाजण्याची सोय केली जाईल. धोकादायक बोगद्यानजीकची भिंत वाढवली जाणार असून दरड कोसळल्यास ती बोगद्याच्या भिंतीवर कोसळेल अशी व्यवस्था केली जाणार आहे. दरड कोसळण्यापासून रोखण्यासाठी परदेशात केल्या जाणाऱ्या उपाययोजनांच्या धर्तीवर द्रुतगती मार्ग आणि अन्य घाटांमध्येही अशा योजना राबवण्याचा राज्य सरकारचा विचार आहे. एकनाथ शिंदे या सर्व उपाययोजनांबाबत सभागृहात सविस्तर निवेदन करणार आहेत, अशी माहितीही सूत्रांनी दिली.
२२ जुलैला मंत्र्यांची द्रुतगती मार्गाला भेट
सुरक्षेच्या उपाययोजनांबाबत सादरीकरण झाले असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही याची माहिती देण्यात आल्याचे एकनाथ शिंद यांनी सांगितले आहे. जाळ्यांचे खिळे खोलवर नसल्याने दरड कोसळली हे खरे आहे. सोमवारी याबाबत सादरीकरण झाले असून २२ जुलै रोजी आपण द्रुतगती मार्गाची पाहणी करणार असून त्याबाबत सभागृहात सविस्तर निवेदन देऊ, असेही ते म्हणाले.
बातम्या आणखी आहेत...