आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Mumbai Rape Case : Offender Siraj Missing, Police Department Not Coordination

मुंबई बलात्कार प्रकरण: नराधम सिराज ‘बेपत्ता’;पोलिस विभागात समन्वय नसल्याचे उघड

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - शक्ती मिल सामूहिक बलात्कार प्रकरणातील आरोपी सिराज रेहमान बेपत्ता झाल्याचे गुरुवारी न्यायालयासमोर सांगण्यात आल्याने मुंबईत पुन्हा खळबळ उडाली. मात्र प्रत्यक्षात हा आरोपी ठाण्याच्या तुरुंगातच असून पुरेशा मनुष्यबळाअभावी त्याला न्यायालयात हजर करण्यात न आल्याचे स्पष्टीकरण तुरुंगाधिका-यांनी दिल्यानंतर या विषयावर पडदा पडला. दरम्यान, आता या प्रकरणाची सुनावणी शुक्रवारी होणार आहे.


छायाचित्रकार तरुणीवर झालेल्या बलात्कारप्रकरणात चांद बाबू शेख, विजय जाधव, सिराज रेहमान, कासीम बंगाली व सलीम अन्सारी या नराधमांना अटक करण्यात आली आहे. सध्या ते कोठडीत आहेत. या प्रकरणाची गुरुवारी जलदगती न्यायालयात सुनावणी होती. सर्व आरोपींना न्यायालयासमोर हजर करण्यात येणार होते. त्यानुसार इतर चौघांना आणण्यात आले. सिराजबाबत विशेष सरकारी वकील उज्वल निकम यांनी न्यायालयासमोर विचारणा केली असता ठाणे तुरुंग अधिका-यांनी तो आमच्या ताब्यात नसल्याचे सांगितले. तर या प्रकरणाचा तपास करत असलेल्या गुन्हे शाखेच्या अधिका-यांनीही तो आमच्या ताब्यात नसून सध्या कुठे आहे हेही माहीत नसल्याचे सांगितले. पोलिसांच्याच दोन विभागातच समन्वय नसल्याचे उघडकीस आल्याने न्यायालयाने त्यांची खरडपट्टी काढली. त्यामुळे काही वेळातच सिराज बेपत्ता झाल्याच्या बातम्या पसरल्या. मात्र नंतर तुरुंग अधीक्षकांनी आरोपी तुरुंगातच असल्याचे सांगितले.


तुरुंग अधीक्षकांना समन्स
सुरत व अहमदाबाद बॉम्बस्फोटातील आरोपी अफजल उस्मानी गेल्याच आठवड्यात पोलिसांच्या हातावर तुरी देऊन न्यायालय परिसरातून पळून गेला. त्याचा अजूनही शोध लागलेला नाही. त्यातच आता बलात्कार प्रकरणातील आरोपीही फरार झाल्याचे वृत्त पसरल्याने मुंबई पोलिसांची नाचक्की झाली. दरम्यान, याप्रकरणी स्पष्टीकरण देण्यासाठी ठाण्याच्या तुरुंग अधीक्षकांनी शुक्रवारी स्वत: हजर राहावे, असे आदेश कोर्टाने बजावले.


सिराज तुरुंगातच
कारागृह विशेष महानिरीक्षक स्वाती साठे यांनी सांगितले की, सिराज ठाणे पोलिसांच्याच ताब्यात आहे. पुरेशा मनुष्यबळाअभावी त्याला आज कोर्टासमोर हजर करण्यात आले नाही. सूत्रांच्या म्हणण्यानुसार, काही दिवसांपूर्वी चार आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आले होते, तेव्हा महिला कार्यकर्त्यांनी त्यांच्यावर अंडे, टोमॅटोचा हल्ला केला होता. त्यामुळे या आरोपींबाबत आता जास्त काळजी घेतली जात असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.