आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मुंबईत महिला सुरक्षितच, पण आता मात्र जास्त चिंता वाटते !

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- ‘आम्ही रात्री एक-दोन वाजता घरी जातो, आजवर कधी भीती वाटली नाही; परंतु आता मात्र चिंता वाटू लागली आहे. मात्र, महिला पत्रकारांना कराटेचे प्रशिक्षण संस्थांनी दिल्यास थोडाफार आळा बसेल,’ अशी प्रतिक्रिया मनोरंजन क्षेत्रातील महिला पत्रकाराने ‘दिव्य मराठी’शी बोलताना व्यक्त केली.


एका मासिकाच्या महिला फोटोग्राफरवर गुरुवारी सायंकाळी पाच नराधमांनी सामूहिक बलात्कार केला. या घटनेनंतर संपूर्ण मुंबईत संतापाची लाट उमटली असून गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी केली जात आहे. माध्यमांमध्ये काम करणा-या महिला पत्रकारांमध्येही चिंतेचे वातावरण आहे. महिला पत्रकारांना रात्री उशिरापर्यंत काम करावे लागते. विशेषत: मनोरंजन क्षेत्रात काम करणा-या महिला पत्रकारांना तर कधी-कधी रात्री एक-दोन वाजेपर्यंतही काम करावे लागते. मात्र, आजवर कधी एखाद्या महिला पत्रकारावर अशी बळजबरी झाल्याची घटना घडली नव्हती.

उशिरापर्यंत काम नाहीच
इंग्रजी साप्ताहिक आणि वर्तमानपत्रांसाठी फ्रीलान्सिंग करणा-या लिपिका वर्माने सांगितले की, मी कधी कधी एकटी रात्री उशिरा रिक्षाने घरी गेले आहे, परंतु मला कधी भीती वाटली नाही. आताही मला तशी भीती वाटत नाही. परंतु कधी काय होईल हे सांगता येत नसल्याने आता मात्र मी पार्ट्यांमध्ये जास्त उशिरापर्यंत न थांबण्याचा निर्णय घेतला आहे.

काळजी घ्यायलाच हवी
गेल्या 27 वर्षांपासून सिने पत्रकारिता करणा-या पूजा सामंतने सांगितले की, विघातक शक्तींची मला नेहमीच भीती वाटत आली आहे. त्यामुळे पार्ट्यांमधून निघताना मी सोबत एखादी महिला पत्रकार घेत असे. फर्स्ट क्लासच्या डब्यात गर्दी नसेल तर मी सेकंड क्लासमधून जात असे. सेकंड क्लासमध्ये गर्दी नसेल तर मी चक्क पुरुषांच्या डब्यातून प्रवास केला आहे. पूर्वीपेक्षा आताचा काळ बदलला आहे. आता विकृत प्रवृत्ती वाढलेल्या आहेत. मुलींनी स्वत:ही काळजी घेतली पाहिजे.

टाइम्स नाऊ, झी, यूटीव्हीच्या महिला पत्रकारांनी सांगितले, चॅनेलच्या महिला पत्रकारांना रात्री घरापर्यंत सोडण्यासाठी गाडी असते, त्यामुळे आम्हाला तशी भीती वाटत नाही. आमच्यासोबत कॅमेरामॅन, ड्रायव्हर असल्याने घरच्यांनाही काळजी नसते. मात्र, मुंबईची स्थिती नक्कीच चांगली नाही.

सोबत मिरची पूड ठेवा
इंग्रजी वर्तमानपत्राच्या चित्रपट प्रतिनिधी शमा भगतने सांगितले की, बॉलीवूडच्या पार्ट्या उशिरापर्यंत चालतात. त्यामुळे आम्हाला आठवड्यातून दोन-तीन वेळा तरी रात्री उशीर होतोच. परंतु आजवर कधी भीती वाटली नव्हती. मात्र, गुरुवारच्या घटनेनंतर चिंता वाटू लागली आहे. सुरक्षेचा उपाय म्हणून महिलांनी मिरचीची पूड पर्समध्ये ठेवावी. त्यामुळे अशा घटनांना थोडाफार तरी आळा बसेल. तसेच महिला पत्रकारांना कराटेचे प्राथमिक प्रशिक्षण दिले तर त्याचाही फायदा नक्कीच होईल.